मोठी बातमी! आगामी निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार..? वाचा नेमकं काय घडलंय
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार धक्का सहन करावा लागला. महायुतीने या निवडणुकीत अनपेक्षित यश मिळवलं. आता निवडणुकीनंतर सगळ्याच पक्षांनी आपापल्या विद्यमान आमदारांची बैठक घेऊन चर्चा करायला सुरुवात केली आहे. सध्या महायुतीत सत्तास्थापनेची लगबग सुरु असली तरी, मविआतील पक्ष मात्र चिंतन बैठका घेताना दिसत आहे. अशातच आता महाविकास आघाडीत फूट पडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने नुकतीच आपल्या आमदार व नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला नूतन आमदारांसह ठाकरे गटाचे नेतेही उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या पराभवानंतर अनेकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. शिवाय आगामी निवडणुका या स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्या सर्व निवडणुकात ठाकरे गटाने स्वबळावर लढावे, असा सूर अनेकांनी व्यक्त केला.
अंबादास दानवे यांनी दिली माहिती
शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीनंतर माजी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, शिवसेना पक्षातील काही लोकांचा सूर आहे की, आपण स्वतंत्र लढले पाहिजे. एक-दोन नाही, तर अनेकांनी असं मत व्यक्त केल आहे. शिवसेनेने स्वतंत्र गेलं पाहिजे, असं अनेकांना वाटतंय. शिवसेनेला सत्ता हवीय, असं काही नाही. त्यामुळेच कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याच्या भावना व्यक्त केल्या, असं दानवे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ठाकरे गट काय निर्णय घेतो, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
ईव्हीएमवर अनेकांचा संशय
दानवे म्हणाले, आमच्या पराभूत उमेदवारांची बैठक झाली. जिंकलेल्या उमेदवारांच्याही अनेक तक्रारी होत्या. अनेकांच्या मनातील खदखद समोर आली. पडलेल्या मतांमध्ये अनेकांना तफावत आढळली. या सगळ्या गोष्टींचा विचार केला, तर कुठेतरी पाणी मुरतंय हे स्पष्ट होतंय. ईव्हीएममध्येच पाणी मुरतंय, असा आरोपच अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. तसेच, बॅलेटवर मतदान व्हावं अशी आता जनभावना होत आहे, त्यासाठी देशपातळीवर जनआंदोलन झालं पाहिजे, असं मतही दानवे यांनी व्यक्त केलं. कन्नड मतदारसंघात जे झालं किंवा इतर अनेक ठिकाणी जे संशयास्पद झालं त्याचं निवडणूक आयोगाने पारदर्शकपणे उत्तर द्याव, अशी मागणीही दानवे यांनी केली.












Click it and Unblock the Notifications