मुंबई रेल्वे अपघात रोखण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुचविली पंचसुत्री, जाणून घ्या ते 5 उपाय
Mumbai train accidents : मुंबईमध्ये मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास कसाऱ्याहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून पडून ५ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर जखमींमध्ये सात पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. लोकलमधून पडून पाच प्रवाशांचे जीव गेल्यानंतर रेल्वे बोर्डाने नवीन येणाऱ्या गाड्या या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसोबत असतील असा निर्णय घेतला.

यासह 238 एसी लोकल मुंबई सबर्बनसाठी घेतल्या आहेत. ज्या गाड्या घेतल्या आहेत, त्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टिमने येणार आहेत. आयसीएफद्वारे एक्झिस्टिंग लोकलला रेट्रो फिकमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याची सिस्टिम लावले जाणार आहेत. मीडीया रिपोर्टनुसार, यासह आता रेल्वे अपघात रोखण्यासाठी शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीने पंचसूत्री सुचविली आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी पाच सूचना या पंचसूत्रीमध्ये करण्यात आल्या असून पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार, जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाला पत्र दिले.
आज मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान दुर्दैवी रेल्वे अपघाताची घटना घडली ज्यात ५ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आणि अनेक जण जखमी झाले. ही घटना अत्यंत गंभीर असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी या सूचना केल्या आहेत, असे सुहास देसाई यांनी सांगितले.
धावत्या रेल्वेगाडीतून पडून झालेले मृत्यू हे वेदनादायक आहेत. लोकल ट्रेनमध्ये गर्दीच्या वेळेतील प्रवास हा नेहमीच जीवघेणा असतो. रेल्वेचा न सुधारण्याचा अट्टाहास हा अनेकांचा जीव घेऊन जातोय. प्रवाशांनी अनेकवेळा मागणी केली आहे की, दिवा टर्मिनेटिव लोकल ट्रेन सुरू करावी. गेल्या दशकात…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 9, 2025
काय आहे शरद पवारांच्या Ncp ची पंचसुत्री
१. राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाने दिलेल्या पत्रात, गर्दी व्यवस्थापन आणि नियंत्रण अतिशय महत्त्वाचे आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी लोकल ट्रेनच्या फेऱ्यांची संख्या तातडीने वाढवाव्या; रेल्वेच्या आणीबाणी हेल्पलाइन नंबर (उदा. १३९) चा मोठ्या प्रमाणावर प्रचार करावा, जेणेकरून गरज पडल्यास प्रवाशांना मदत मागता येईल.
२. रेल्वे स्थानकांवर, विशेषतः प्रवेशद्वारांवर आणि फलाटांवर, प्रवाशांच्या गर्दीचे योग्य नियमन करण्यासाठी अधिक रेल्वे पोलीस किंवा सुरक्षा कर्मचारी तैनात करावेत; पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत तंत्रज्ञान याचा योग्य वापर करून स्थानकांवरील घोषणा प्रणालीमध्ये आवश्यक बदल करीत अपघातप्रवण क्षेत्रांबद्दल आणि सुरक्षित प्रवासाच्या नियमांबद्दल वारंवार घोषणा कराव्यात.
३. लिफ्ट आणि सरकते जिने हे व्यवस्थित सुरू आहेत की नाही हे पाहत त्यांची वेळोवेळी पाहणी करणे आवश्यक आहे; रेल्वे सिग्नल प्रणाली अधिक आधुनिक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी गुंतवणूक करावी. संभाव्य धोके ओळखण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच यंत्रणेची नियमित तांत्रिक तपासणी आणि देखभाल करणे आवश्यक असून लोकल ट्रेन, रुळ आणि सिग्नल यंत्रणा यांची नियमित आणि कठोर तांत्रिक तपासणी आणि देखभाल केली जात असल्याची खात्री करावी.
४. कोणत्याही तांत्रिक दोषाला त्वरित दुरुस्त केले जावे. ट्रेनमध्ये ब्लॅक बॉक्स प्रणाली (विमान कंपन्यांमध्ये असते तशी) बसवण्याचा विचार करावा, ज्यामुळे अपघाताची नेमकी कारणे शोधून भविष्यातील अपघात टाळण्यासाठी त्याची मदत होईल.
५. दिवा, मुंब्रा, कळवा या स्थानकासह ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी दिवा येथील होम प्लॅट फॉर्मवरुन दिवा टर्मिनेटींग लोकल सुरु करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications