मोठी बातमी: काँग्रेसला 'नकार' देत शरद पवारांचे ठाकरे बंधूंशी युतीचे संकेत!मुंबई मनपात नवा फॉर्म्युला
Sharad Pawar Signals Alliance with Thackeray Brothers : आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाचे राजकीय संकेत दिले आहेत. शनिवारी मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीत, पवारांच्या पक्षाने काँग्रेससोबत जाण्याऐवजी उद्धव ठाकरे (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राज ठाकरे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना - मनसे) यांच्याशी युती करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा राजकीय निर्णय
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मुंबई मनपा निवडणुकीसाठी एक नवा अजेंडा निश्चित केल्याचे सूत्रांनी सांगितले. बैठकीत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशी युतीसाठी चर्चा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
राष्ट्रवादीने भाजप वगळता इतरांसोबत युती करण्यास हरकत नसल्याची भूमिका घेतली आहे. यामध्ये समाजवादी पक्ष (SP) किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यासोबतही युती करण्यास पक्षाची तयारी असल्याचे संकेत मिळाले आहेत.
दिल्लीतून आदेश आल्याशिवाय
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 22, 2025
म न से ला आघाडीत घेणार नाही: मुंबई कांग्रेस
हा कांग्रेस चा व्यक्तिगत निर्णय असू शकतो
शिवसेना आणि म न से आधीच एकत्र आले आहेत,ही लोकेच्छा आहे
त्यासाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही
श्री शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत
मुंबई वाचवा! pic.twitter.com/kwDg49jJjy
काँग्रेसला अप्रत्यक्ष नकार
गेल्या आठवड्यात काँग्रेसने राष्ट्रवादीला सोबत घेऊन पालिका निवडणूक लढवण्याची चर्चा केली होती. मात्र, राष्ट्रवादीने आता ठाकरे बंधूंशी युतीचे संकेत दिल्याने, काँग्रेसच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
मनसेवरुन काँग्रेसमध्ये मतभेद!
राष्ट्रवादी काँग्रेस मनसेला सोबत घेण्यास सकारात्मक असताना, काँग्रेस पक्षातील नेतृत्वात मात्र यावरून मोठे मतभेद दिसून येत आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्रित आले पाहिजे, अशी भूमिका मांडली होती. त्यांनी मनसेला सोबत घेण्याच्या पर्यायाचा विचार होऊ शकतो, असे संकेत दिले होते.
या भूमिकेला मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, "मारझोड करणाऱ्या, हाणामारी करणाऱ्या पक्षांसोबत जायचं नाही", हा मुंबई काँग्रेसचा निर्णय झालेला आहे.
आपण समविचारी पक्षांसोबतच बोलणी करत आहोत, असे त्यांनी सांगितले. त्यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून, "उद्धव ठाकरेंनी त्यांचा पक्षाचा निर्णय घ्यावा. आमची जोडण्याची भूमिका आहे, तोडण्याची नाही" असे स्पष्ट केले.
काँग्रेसमध्ये मनसेच्या समावेशावर मतभेद असतानाच, राष्ट्रवादीने मात्र राज ठाकरे यांच्या मनसेशी युतीचा पर्याय खुला ठेवला आहे, जो अत्यंत महत्त्वपूर्ण राजकीय संकेत आहे.
पवारांच्या निर्णयाचे महत्त्व
गेल्या आठवड्यात काँग्रेसला निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर, शरद पवारांनी आता थेट ठाकरे बंधूंसोबत युतीचे संकेत देऊन राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. हा निर्णय भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवी दिशा देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications