सत्तेचा गैरवापर हे भाजपचं सूत्र, त्यांच्यापासून राज्याची सुटका करण्यासाठी सत्तांतर हवंच - शरद पवार
"लोकसभा निवडणुकीत आपण संविधानासंदर्भात जी भुमिका घेतली त्यात यश आलं. याचा अर्थ संविधानावरचं संकट टळलं असा होत नाही. सत्तेचा गैरवापर हे सूत्र आजच्या भाजपच्या राज्यकर्त्यांचं आहे. त्यांच्यापासून महाराष्ट्राची सुटका करण्याची गरज असून राज्यात सत्ताबदलांशिवाय पर्याय नाही." असं वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.
महाविकास आघाडीचा आज मुंबईत संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने या मेळाव्याला सुरुवात झाली. शरद पवार आता या मेळाव्यात संबोधित करत असून त्यांनी केंद्रातील एनडीए सरकार तसेच महायुती सरकारवर सडकून टीका केली.

शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता गेल्याचे अनेक उदाहरणं आहेत. निवडणुकीला सामोरे जायचे असून आपल्याला यश मिळवायचं आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांना सन्मानानं सोबत नेत महाराष्ट्रात चांगलं सरकार आणूया.
महाराष्ट्रावर संकट
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रावर जे संकटं आहेत, त्यातून महाराष्ट्राची सुटका कशी करता येईल यासंबंधीची दिशा आपल्याला ठरवायची आहे. त्यासाठी आजचे हे संमेलन आहे. महाराष्ट्रात जे परिवर्तन करायचे आहे त्यासाठी काय करायचे याचं मार्गदर्शन आणि चर्चा व्हावी, आता हे करण्याचे दिवस आहेत.
देशावरचं संकट टळलं नाही
शरद पवार म्हणाले, आजही देशावरचं संकट पुर्णपणानं गेलं असा निष्कर्ष काढता येणार नाही. लोकसभा निवडणुकीच्यावेळी संविधानाच्या संदर्भात एक भूमिका आपण मांडली. त्या निवडणुकीत काही प्रमाणात यश आलं पण याचा अर्थ संविधानावरील संकट गेलं असा निष्कर्ष काढता येणार नाही.
विरोधी पक्षाची प्रतिष्ठा तितकीच महत्वाची
शरद पवार म्हणाले, देशाची सुत्रं ज्यांच्या हाती आहे त्या सगळ्या संविधानाबाबत विचारधारा आणि तरतूदी यांच्या सोईच्या नाहीत. पंतप्रधानाची प्रतिष्ठा देशानं ठेवायला हवी ही जी अपेक्षा असते तसंच विरोधीपक्षाची प्रतिष्ठाही तितकीच महत्वाची आहे.
विरोधी पक्षाची प्रतिष्ठा ठेवली गेली नाही..
शरद पवार, अटलबिहारी यांचे सरकार होते, मी विरोधी पक्षनेता होतो. मनमोहनसिंग पंतप्रधान होते त्यावेळी सुषमा स्वराज या विरोधीपक्षनेत्या होत्या. त्यावेळी पंधरा ऑगस्टचाच काळ होता. तेव्हा प्रतिष्ठा जपली जायची. या संस्थांची प्रतिष्ठा आणि सन्मान करण्याची जबाबदारी प्रत्येक राज्यकर्त्यांची आहे. मल्लिकार्जून खरगे किंवा राहूल गांधी यांची प्रतिष्ठा ठेवली जाईल अशी अपेक्षा जर ठेवली तर ती सत्ताधारी केंद्र सरकारकडून ठेवली गेली नाही.
परिवर्तनासाठी प्रयत्न करा
शरद पवार म्हणाले, लोकशाही संस्थांच्या पद्धतीवर विश्वास नसलेले राज्यकर्ते आज देशाच्या सत्तास्थानी बसले त्यामुळं आपल्याला अतिशय जागृत राहण्याची गरज आहे. आता राज्यातील निवडणुकीचे कमी दिवस राहीले आहेत. आता सामान्य लोकांत जाऊन परिवर्तनाचा विचार त्यांच्यात रुजवावा लागेल.
सत्तातंर हवेच
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राचे चित्र बदलायचे असेल तर सत्तांतर हवेच. चुकीच्या लोकांच्या हातातून सत्ता काढणं, चुकीच्या पद्धतीनं सत्ता वापरली जात आहे, याची अनेक उदाहरण दिसतात. सत्तेचा गैरवापर हे सूत्र आजच्या भाजपच्या राज्यकर्त्यांचं आहे. त्यांच्यापासून महाराष्ट्राची सुटका करण्याची गरज आहे.












Click it and Unblock the Notifications