शरद पवारांनी व्यक्त केलं हे दुःख, पुतण्याचे टोचले कान! म्हणाले - त्यांना समजायला हवं होतं
Sharad Pawar on Ajit Pawar over irrigation scam : भाजपकडून गंभीर आरोप केल्या जाणाऱ्या राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्याला कलाटणी देणारे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते, त्यांनी तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर एक भाष्य केलं होतं. यानंतर अजित पवारांवर बरीच टीकाही झाली. त्यानंतर आता खुद्द शरद पवार यांनीच यावर आपलं मत व्यक्त केले आहे. राज्यातील स्वच्छ व्यक्तिमत्व असलेल्या आर. आर. पाटील यांच्यावर ते गेल्यानंतर नऊ वर्षांनी टीका करणं योग्य नाही त्यांना हे समजायला हवं असे पवार म्हणाले.
तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून संजय काका पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी अजितदादांनी धक्कादायक गोप्यस्फोट करत सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचे खापर हे दिवंगत नेते आर. आर. (आबा) पाटील यांच्यावर फोडले होते.

नेमके काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले, आम्ही तरी सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केलेला नाही पण हा मुद्दा कुणी काढला हे परत सांगायची गरज तर नाही पण एकाच गोष्टीचे वाईट वाटते. आर. आर. पाटील म्हणजेच आबा यांचा महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ व्यक्तिमत्व म्हणून म्हटले जाते पण त्यांच्यासंर्भात उलट-सुलट चर्चा केली जाते हे अत्यंत अयोग्य आहे. अशी वक्तव्य त्यांच्या जाण्याच्या नऊ वर्षानंतर करणे किती योग्य आहे हे वक्तव्य करणाऱ्याने समजायला हवं. सत्ता हातात आली की, आपण बोलायला मुक्त आहोत असाच काही लोकांचा समज असतो. कदाचित हा त्याचाच एक भाग असेल असे वक्तव्य शरद पवारांनी केले. त्यांचा रोख अजित पवारांकडे होता.
आबांबद्दल काय म्हणाले होते अजित पवार?
भाजपने आरोप केलेल्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचे खापर अजित पवार यांनी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर फोडले आहे. त्यावेळी माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले आणि चौकशीची करण्यासाठी फाईल तयार करण्यात आली. त्या फाईलवर आर. आर. आबांनी सही केली असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर हा केसाने गळा कापण्यासारखा प्रकार असल्याचाही उल्लेख त्यांनी केला.
अजित पवार सभेत बोलताना म्हणाले होते की, इतक्या वर्षात केवळ बेचाळीस हजार कोटी रुपयांची कामे झाली होती. तरी माझ्यावर 70 हजार कोटींचा आरोप झाला. मात्र, आकडा जेवढा मोठा आकडा, तितके लोक गंभीरतेने घेतात. म्हणून आकडा मोठा केला असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
या आरोपांमुळे माझ्या चौकशीची फाईल तयार झाली. ती फाईल सही करण्यासाठी गृह विभागाकडे गेली. त्यावर आर. आर. पाटील यांनी सही देखील केली. त्या नंतर ही फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेली. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावर सही केली नाही. त्याच वेळी आम्ही सरकारचा पाठिंबा काढला आणि सरकार पडून राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतरच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर सही केली आणि मला बोलवून आर. आर. पाटील यांनी सही केल्याचे दाखवले, असे देखील अजित पवार यांनी म्हटले होते.
पोलिस दलाच्या गाड्यातून रसद पाठवली जातेय- शरद पवारांचा गंभीर आरोप
शरद पवार म्हणाले, उमेदवारांचे एबी फाॅर्म विमानाने पाठवण्यात आले हे आणि अशा अनेक गोष्टी नव्याने पाहत आहोत. विमानाने एबी फाॅर्म पाठवले अनेक जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांकडून ऐकतो की, सत्ताधारी पक्षांकडून अर्थसहाय्य्साठी पोलिस दलाच्या गाड्यातून रसद पाठवली जाते असे काही विभागाचे अधिकारी सांगतात.












Click it and Unblock the Notifications