शरद पवारांचा अजित पवारांना टोला, मात्र फडणवीसांचं कौतुक; नेमकं काय घडलं?
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा काका-पुतण्यांमध्ये राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटांमध्ये सध्या जवळ येण्याच्या चर्चांना जरी उधाण आले असले तरी, शरद पवारांनी नुकत्याच एका जाहीर कार्यक्रमात या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे सूचित केलं की, ते ना अजित पवारांच्या गटासोबत, ना भाजपच्या वाटेवर जाणार आहेत.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या मेळाव्यात शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपल्या भूमिकेचं स्पष्टपणे समर्थन केलं. मालेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांनी घेतलेल्या पवित्र्यावर अप्रत्यक्ष टीका करत, पवार म्हणाले, "लोकांना बरोबर घेण्याची वृत्ती दाखवली असती, तर आजची स्थिती टाळता आली असती. पण, जे झालं ते झालं, आता पुढे पाहायचं."
"माझं नाव असलेला कारखाना, पण आमचा टोकाचा हस्तक्षेप नव्हता"
शरद पवारांनी स्पष्ट केलं की, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपली टोकाची भूमिका घेण्याची इच्छा नव्हती, आणि अजूनही ती नाही. या साखर कारखान्याशी त्यांचं नाव जोडलेलं असलं, तरीही कारखाना हा स्थानिक प्रश्न असून, आसपासच्या तालुक्यांच्या दृष्टिकोनातून त्याला फारसं महत्त्व नाही, असंही त्यांनी नमूद केलं.
"हा सध्या फक्त १९ हजार सभासदांपर्यंत मर्यादित प्रश्न आहे. दीर्घकालीन नाही. परिस्थिती थोडी वेगळी होती. पण आम्ही ताणलं नाही," असं सांगत त्यांनी चंद्रराव तावरे यांच्याशी संबंधित संदर्भही मांडला. काही अडचणींच्या पार्श्वभूमीवर, संबंधित लोकांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी भूमिका मवाळ ठेवली, असंही ते म्हणाले.
AIसंदर्भातील निर्णयाबद्दल शरद पवारांनी फडणवीसांचे केले कौतुक
राज्य मंत्रिमंडळाने अलीकडेच घेतलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरासंदर्भातील निर्णयाचं शरद पवारांनी विशेष स्वागत केलं. त्यांच्या मते, हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
"महाराष्ट्र सरकारने 500 कोटींचा निर्णय घेतला, जो ऊस आणि इतर पिकांमध्ये AI चा वापर करण्याबाबत होता. यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो. त्यांनी पुढाकार घेतला, हे धाडसाचं पाऊल आहे. संपूर्ण देशात हे पहिले राज्य आहे, जे शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता स्वीकारत आहे," असं मत शरद पवारांनी मांडलं. त्यांनी यासंदर्भातील वर्कशॉप्स आणि धोरणात्मक नियोजनात आपलं लक्ष असल्याचंही अधोरेखित केलं.
संपूर्ण घडामोडींचा विचार करता, शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संभाव्य एकीवर सध्या तरी पडदा पडल्याचं स्पष्ट होत आहे. शरद पवारांनी परस्पर संबंधांना स्पष्टपणे दूर ठेवलं असून, साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने, दोघांमधील विचारविभाजन अधिक ठळकपणे समोर आलं आहे.












Click it and Unblock the Notifications