देशमुख कुटुंब महंतांची भेट घ्यायला भगवान गडावर जाणार; वैभवी देशमुख हिने सांगितले खरे कारण...
मंत्री धनंजय मुंडे दोन दिवसांपूर्वी भगवान गडावर गेले होते. त्यानंतर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे वक्तव्य केले होते. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्री मुंडे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र भगवानगडानेच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोन्ही बाजूने प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. आता ज्या प्रकरणामुळे मुंडे अडचणीत आले होते, तेच देशमुख कुटुंब महंत शास्त्री यांची भेट घ्यायला गडावर जाणार आहे. सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीने याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.

काय म्हणाली वैभवी?
महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर देशमुख कुटुंबाने यावर प्रतिक्रीया दिली. सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी म्हणाली, न्यायाधीश सुद्धा दोन्ही वकिलांच्या बाजू ऐकून घेतात आणि नंतरच मत मांडतात. परंतु नारायण शास्त्री यांनी फक्त एकच बाजू ऐकून त्यांचे मत मांडले. त्यामुळे आम्ही आमची बाजू मांडायला भगवान गडावर जाणार आहोत. माझे वडील वारकरी होते. त्यामुळे त्यांची हत्या झाल्यावर महंतांनी आम्हाला भेटायला यायला हवे होते. ते आले नाहीत, तरी हरकत नाही. मात्र आता आम्ही गडावर जाऊन आमची बाजू मांडू. आमचे पुरावे दाखवू. त्यांनी एकतर्फी केलेल्या वक्तव्यामुळे आम्हाला दुःख वाटले, असेही वैभवीने सांगितले.
धनंजय देशमुखांचीही नाराजी
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही यावर आपले मत मांडले. ते म्हणाले की, महंतांना फक्त एक बाजू माहीत आहे. आम्ही त्यांना दुसरी बाजू सांगणार आहोत. महाराज म्हणतात की, मीडियाने आरोपींची मानसिकता दाखवली नाही. या वक्तव्याचा मला मानसिक त्रास झाला. आरोपींची मानसिकता बघण्यापेक्षा माझ्या भावाचे किती हाल केले, हे महंतांनी पहायला हवे होते. जे लोक खंडणी मागतात, खंडणीसाठी अपहरण करतात, खंडणीसाठी खून करतात, त्या लोकांची मानसिकता महंतांनी पहायला हवी होती, असंही धनंजय देशमुख म्हणाले. आम्ही आमची बाजू मांडायला भगवान गडावर जाणार आहोत, असं देशमुख कुटुंबाने सांगितलं.
जरांगेंनीही मांडले मत
भगवान गडाचे महंतांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही आपले मत व्यक्त केले. मीडीयाने त्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राला जातीयवादाचा एक नवा अंक पाहायला मिळाला. कारण, आजपर्यंत आम्ही आमचा हक्क मागितला तरी आम्ही जातीयवादी ठरत आहोत. मग, अशा मोठ वलय असणाऱ्या, मोठी गडाची परंपरा असताना, साधूसंतांचा मार्ग सांगत असताना आणि ज्यांना सर्व जाती समूहाची मान्यता असताना महंतांनी अशी कुणाची बाजू कशी घ्यावी असा थेट प्रश्नही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.












Click it and Unblock the Notifications