सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण: वाल्मिक कराडला जामीन मिळणार? मोठी अपडेट समोर...
बीड: बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला जामीन मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला असून, कराडच्या वकिलांनी अटकेच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. सध्या कराड कारागृहात असून, त्याच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

वकिलांचा युक्तिवाद
वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला आहे की, कराडला अटक करताना अटकेची कारणे स्पष्ट केली नव्हती. त्यामुळे अटकेची प्रक्रिया कायदेशीर नव्हती. या दाव्यामुळे या प्रकरणात एक नवीन बाजू समोर आली आहे. या युक्तिवादाला सरकारी पक्षाने तीव्र विरोध केला आहे.
प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया
या प्रकरणावर बोलताना सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, "आरोपीच्या वकिलांनी जामिनासाठी युक्तिवाद केला आहे, पण आम्ही त्याला जोरदार विरोध केला आहे. आम्ही न्यायालयासमोर अनेक पुरावे सादर केले आहेत. अटकेच्या वेळी कारणे सांगितली गेली नाहीत, असा मुद्दा त्यांनी मांडला. परंतु आम्ही ती बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे." निकम यांनी असेही सांगितले की, या प्रकरणात आणखी एक आरोपी विष्णू चाटे यानेही दोषमुक्तीसाठी अर्ज केला आहे.
संतोष देशमुख यांच्या बंधूंची प्रतिक्रिया
या प्रकरणावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, "आरोपीचे वकील जामिनासाठी प्रयत्न करत आहेत, पण उज्ज्वल निकम साहेबांनी आरोपींचा गुन्हा कसा सिद्ध होतो, हे न्यायालयात मांडले आहे. हे संघटित गुन्हेगारीचे प्रकरण आहे. हे आरोपी कसे आहेत आणि त्यांच्यामागे कोण आहे, हे स्पष्ट झाले आहे. आम्हाला अपेक्षा आहे की पुढील सुनावणीत आरोप निश्चित केले जातील."
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. या दिवशी न्यायालय काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.












Click it and Unblock the Notifications