गिरीश महाजन दलाल, संजय राऊत यांचा घणाघात; "शिवसेना संपवणं अशक्य"
शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. नाशिकमध्ये महाजन यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राऊत यांनी त्यांना "पक्ष फोडण्याचं कंत्राट घेतलेला दलाल" अशी उपमा देत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

गिरीश महाजनांचं वक्तव्य अन् त्यावर राऊत यांची प्रतिक्रिया
गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये बोलताना म्हटलं होतं की, "उद्धव ठाकरे यांचा पक्ष आता अस्तित्वात राहणार नाही. येत्या आठवड्यात त्यांच्या सोबत कोणीच उरणार नाही." या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, "भाजपकडून लोकांना धमकावून पक्ष फोडण्याचं काम सुरू आहे आणि त्यासाठी काही दलाल नेमले गेले आहेत. त्यात प्रमुख म्हणजे गिरीश महाजन. हातात सत्ता, पोलिस आणि पैसा घेऊन हे लोक आमचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत आहेत."
"गिरीश महाजन यांचाच पक्ष जागेवर आहे का?"
राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला की, "गिरीश महाजनांचा पक्ष स्वतः स्थिर आहे का, हे आधी पाहावं." त्यांनी आरोप केला की, "हे लोक भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहेत. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा गिरीश महाजन यांच्या चौकशा सुरू होत्या. त्यावेळी ते पक्ष बदलण्याच्या तयारीत होते. निरोप येत होते की 'मी राजकारणातून बाहेर पडतो', 'मी गप्प बसतो' - हे सगळं त्यांचं पळपुटेपण दाखवतं."
शिवसेनेची भूमिका आणि बाळासाहेबांचा आदर
"आज तुम्ही ज्या शिवसेनेच्या नाशाची भाषा करता, तीच शिवसेना तुम्हाला राजकारणात उभी राहायला शिकवली," असं सांगत राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या योगदानाची आठवण करून दिली. "शिवसेनेने तुम्हाला चड्डी बांधायला शिकवलं, हे विसरू नका," अशी जहरी टीका त्यांनी केली.
"शिवसेना संपवणं अशक्य - दहा पिढ्या लागल्या तरी नाही जमणार"
राऊत म्हणाले की, "शिवसेना ही एका विचारसरणीवर आधारित चळवळ आहे. या पक्षाला संपवणं हे कोणाच्याच शक्तीबाहेरचं आहे. गिरीश महाजन यांच्यासारखे लोक केवळ काही आमदार फोडून मोठेपणा मिरवत आहेत, पण शिवसेना संपवण्याचा गोड गैरसमज त्यांना भोवणार आहे." त्यांनी भाजपवरही टीका करत म्हटलं की, "अमित शाह यांनी महाराष्ट्र संपवण्याचा प्रयत्न केला, पण महाराष्ट्र आणि शिवसेना टिकून राहिली."
"नाचगिरी म्हणजे राजकारण नाही"
शेवटी राऊत म्हणाले की, "गिरीश महाजन यांचा अभ्यास उथळ आहे. माईक समोर येऊन नाचगिरी करणे म्हणजे राजकारण नव्हे. पक्षाला संपवण्याच्या भाषा केवळ राजकीय थोतांड आहे. शिवसेना कायम राहणार आणि अधिक बळकट होणार."












Click it and Unblock the Notifications