राजकीय वर्तुळात खळबळ; सप्टेंबरनंतर राज्यात मोठी उलथापालथ? कोणी केला हा मोठा दावा
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडी आणि मंत्र्यांच्या खातेबदलाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटून सध्याच्या मित्रपक्षांसोबत काम करणे अवघड झाल्याचे सांगितल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. 'सप्टेंबरपर्यंत वाट पाहा', असे सूचक विधान करत लवकरच काहीतरी मोठा राजकीय बदल घडणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

'सरकार कलंकित झाले आहे, मंत्र्याला जावेच लागेल'
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, "हे सरकार पूर्णपणे कलंकित झाले आहे. वसईच्या आयुक्तांवर पडलेली धाड 1000 कोटी रुपयांचे प्रकरण आहे आणि या प्रकरणात एका मंत्र्याला निश्चितच जावे लागेल." नुकताच खातेबदल झालेल्या क्रीडामंत्र्यांवरही त्यांनी निशाणा साधला. "नव्या क्रीडामंत्र्यांना योग्य खाते मिळाले आहे, पण त्यांनाही जावे लागेल. ही व्यवस्था तात्पुरती सुरू आहे. प्रत्येक आरोपी शेवटपर्यंत बचावाचा प्रयत्न करतो," असा टोला त्यांनी लगावला.
'फडणवीसांना हे ओझे फेकून द्यायचे आहे'
देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या भेटीबद्दल माहिती मिळाल्याचा दावा राऊत यांनी केला. ते म्हणाले, "मंत्र्यांचा खातेबदल ही केवळ थातूरमातूर कारवाई आहे. आरोपी मंत्री आणि त्यांचे बॉस आपल्या माणसांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत." पुढे ते म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच या सगळ्याचे ओझे झाले आहे. त्यांनाही हे ओझे उचलून फेकून द्यायचे आहे."
'सप्टेंबरपर्यंत वाट पाहा...'
राऊत यांच्या दाव्यानुसार, फडणवीस यांनी अमित शहांना सांगितले आहे की, "अशा लोकांमुळे सरकारची आणि राज्याची बदनामी होत आहे आणि आता काहीतरी मोठा निर्णय घ्यावा लागेल." 'सप्टेंबरपर्यंत वाट पाहा, काय होते ते तुम्हाला समजेलच,' असे सूचक विधान करून राऊत यांनी आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.












Click it and Unblock the Notifications