पूल कोसळतो आणि अजित दादा कुठे गायब होतात?, संजय राऊत भडकले...
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून, १८ हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने (NDRF) आतापर्यंत ५१ जणांचे प्राण वाचवले आहेत, मात्र काहीजण अद्यापही बेपत्ता असल्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.
पूल कोसळतो आणि पालकमंत्री अजूनही गप्प का?
संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत विचारले, "काल पूल कोसळला, लोक वाहून गेले, मृत्यूमुखी पडले... पण अजित दादा अजून कुठेच दिसले नाहीत. त्यांच्या तावातावाच्या भाषणांना नेहमीच आपण सवयीचे झालो आहोत, मग आता ते गप्प का?"
पुण्याचा अभिमान बाळगणारे अजित दादा आता जबाबदारी घेणार का?
राऊतांनी अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यातील दीर्घकालीन पालकमंत्रिपदावर निशाणा साधला. "त्यांना पुण्याचा पालकमंत्री असल्याचा खूप अभिमान आहे. म्हणे मी आणि पुणे वेगळं नाही. मग काल घडलेल्या दुर्घटनेबद्दल ते जबाबदारी स्वीकारणार आहेत का? की नेहमीप्रमाणे चुकूनही नाही म्हणत झटकून टाकणार?"
छोट्या पुलांमध्ये गाफील, मोठ्या ठेकेदारांत जागरूक!
राऊतांनी आरोप केला की, "एक दोन कोटींचा पूल देखील अजित पवार उभा करू शकले नाहीत. असे छोटे प्रकल्प दुर्लक्षित ठेवले जातात. मात्र मोठे ठेके, मेट्रोचे प्रकल्प आणि बिल्डरांचे कामांमध्ये मात्र पालकमंत्री पूर्ण जागे असतात."
भ्रष्टाचार आणि बेफिकरीची किंमत जनतेला का?
या दुर्घटनेचा उल्लेख करत राऊत म्हणाले, "ही दुर्घटना भ्रष्ट कारभार आणि बेजबाबदार प्रशासनामुळे घडली आहे. मुख्यमंत्री म्हणतात चौकशी होईल, पण चौकशी तर तुमचीच झाली पाहिजे! राज्यात एकामागोमाग एक दुर्घटना, हे काय प्रशासन आहे?
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा
संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, "या घटनेला फक्त अजित पवार नव्हे तर त्या वेळचे मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री देखील दोषी आहेत. या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. केवळ चौकशीच्या आश्वासनावर काहीही बदल होणार नाही."
नाकाने कांदे सोलणारे नेते... पण बळी गेलेल्या जीवांचं काय?
शेवटी राऊत म्हणाले, "नाकाने कांदे सोलण्याची अदा दाखवणारे अजित दादा, आता तरी नैतिक जबाबदारी स्वीकारा. चुकीचं झालं, हे मान्य करा. ही केवळ अपघाताची घटना नाही, तर व्यवस्थेच्या अपयशाची साक्ष आहे."












Click it and Unblock the Notifications