पंतप्रधान स्वतःला सुपरमॅन समजतात, त्यांच्या बहुमताची सतरंजी सामान्य माणसाने खेचून घेतली! संजय राऊतां
मुंबई - जी व्यक्ती म्हणते की, मी युक्रेन रशियाचे युद्ध थांबवले, ती व्यक्ती स्वतःला सुपरमॅन समजते. पण त्याच व्यक्तीला मणीपूर आणि जम्मू-काश्मीरमधील हिंसाचार थांबवता येत नाही. या सुपरमॅनच्या पायाखालची सतरंजी सामान्य माणसाने खेचून घेतली असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्ष टिका केली.
ते स्वतःला सुपरमॅन समजतात
संजय राऊत म्हणाले, एक व्यक्ती देशात आहे जी स्वतःला सुपरमॅन समजते. एक व्यक्ती आहे या देशात जी म्हणते की, मीच युक्रेन आणि रशियाचे युद्ध थांबवले पण तीच व्यक्ती मणीपूर आणि जम्मूकाश्मीर मधील हिंसाचार थांबवू शकत नाही. मला असे वाटते की, त्याच व्यक्तीविषयी मोहन भागवत म्हणाले असावे की, ती व्यक्ती स्वतःला सुपरमॅन समजते.

सामान्य माणूसच सुपरमॅन
संजय राऊत म्हणाले की, या देशात एक व्यक्ती आहे, जी स्वतःला विष्णुचा तेरावा अवतार समजते. एक व्यक्ती आहे देशात, ज्या व्यक्तीला वाटते की प्रभू श्रीराम यांचे बोट धरून तेच त्यांना अयोध्येच्या राम मंदिरात घेऊन गेले. ते नसते तर अयोध्येत प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा झालीच नसती. एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला सुपरमॅन समजते. या सुपरमॅनच्या पायाखालची बहुमताची सतरंजी सामान्य माणसांनी खेचून घेतली. काॅमन मॅन हाच सुपरमॅन आहे. मोहन भागवत यांच्या त्या वक्तव्याचे चिंतन त्यांनी करायला हवे.
350 लोक रेल्वे अपघातात मृत्यूमुखी
संजय राऊत म्हणाले की, रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव यांच्या कार्यकाळात अपघाताची मालिका सुरुच आहे. आतापर्यंत सव्वातीनशे लोक रेल्वेअपघातात मृत्युमुखी पडले आहेत. हा आकडा अत्यंत गंभीर आहे. तुम्ही बुलेट ट्रेन, सुपरफास्ट ट्रेन आणता आहात पण सामान्य माणसं लोकल आणि पॅसेंजर ट्रेनमधून प्रवास करतात ती सिग्नल यंत्रणा, रुळ यासंदर्भात सरकार काहीही करायला तयार नाही. सामान्यांचे जीवनासाठी सरकारकडे कोणत्याही योजना नाही. रेल्वेही त्यांना श्रीमंतासाठी चालवायचे आहे.
मोहन भागवत यांचे ते वक्तव्य
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते की, जेवढा विकास करण्याचा विचार केला होता, तिथवर आपण पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर दिसते की, यापुढेही बरेच काही करण्यासारखे आहे. पण ज्या माणसात माणुसकी नाही, त्याने आधी माणूस बनावे. पण काही लोक विकासाच्या निर्धारीत टप्प्यावर पोहोचल्यावर मानवाचे सुपरमॅन बनू पाहतात.
सुपरमॅन बनल्यावरही ते थांबत नाहीत, त्यांना वाटते आता पूजनीय बनायला हवे. पण पूजनीय म्हणतात आमच्यापेक्षा देव मोठे, तर देव म्हणतो माझ्यापेक्षा विश्वरुप मोठे. आता विश्वरुपाच्या पुढेही काही आहे का? हे कुणाला माहीत नाही. विकासाचा काही अंत नाही. ही निरंतर चालत राहणारी प्रक्रिया आहे''.












Click it and Unblock the Notifications