दाढी पिकंली अन् जगभर फिरून मजा मारली, संघानेच मोदींना दिलाय निवृत्तीचा इशारा; संजय राऊत कडाडले!
Sanjay Raut on PM Modi Retirement : आगामी सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होताहेत. आता त्यांची दाढी पिकली आहे, त्यांच्या डोक्यावरचे केसही गेलेत, जगभ्रमण करून झालंय अन् सगळी सुखं त्यांनी भोगली आहेत. त्यामुळे त्यांनी निवृत्ती घेतली पाहिजे, असा संकेत राष्ट्रीय संघाच्या वतीने त्यांना वारंवार दिला जातोय, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी वयाच्या 75 वर्षाच्या निवृत्तीवरुन काल विधान केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधलाय.
ते म्हणाले की, ७५ वर्षे झाल्यावर राजकारणातून निवृत्त झाले पाहिजे हा नियम मोदी अन् आरएसएस यांनीच केला आहे, त्या नियमाच्या आधारावरच मोदींनी भाजपमधील बडया-बड्या नेत्यांना घरी पाठवलंय अन् त्यांना एका बाजूला सारलं. त्यात अनेक बड्या राजकीय नेत्यांची नावे देखील राऊत यांनी घेतली.

मोदींनी स्वार्थासाठी निवृत्ती लादली
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, काही लोकांना आठवत असेल मी या संदर्भात एक रोखठोक लिहिलं होतं. नरेंद्र मोदी जेव्हा संघ मुख्यालयात प्रथमच गेले होते. तेव्हा सरसंघचालक आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली होती त्याचा सारांश मी मांडला होता.
या बड्या नेत्यांना मोदींनी बाजूला केले!
राऊत पुढे बोलताना म्हणाले की, मुळात, नरेंद्र मोदी यांनी स्वतःच नियम केला, तसेच संघाने नियम केला 75 वर्ष झाल्यावर निवृत्ती पत्करावी. मोदींनी आपल्या स्वार्थासाठी सत्तेच्या पदावरून लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंह अशा अनेक नेत्यांना निवृत्ती जबरदस्तीने लादली. आपला मार्ग मोकळा करण्यासाठी मोदींनी त्या नेत्यांवर निवृत्ती लादली आहे.
शहांच्या मनात निवृत्तीचा विचार येतोय, हे चांगले संकेत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवृत्तीनंतर काय करणार? याबाबत सुतोवाच केले. त्यावर संजय राऊत म्हणाले की, निवृत्तीनंतर कोणी काय करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जीवनात अनेक चांगल्या गोष्टी करता येतात. जसे आमचे नानाजी देशमुख होते. त्यांनी उत्तम प्रकारचे कार्य केले. अनेक जण आपापल्या भागात सामाजिक आणि इतर काम करत असतात. त्यांच्यापेक्षा आपल्याला कोण काय करणार त्याविषयी चर्चा करण्याचे कारण नाही. किंबहुना त्यांच्या मनात निवृत्तीचे विचार येत आहेत हे देशासाठी शुभ संकेत आहेत, असा टोला देखील राऊत यांनी लगावला.
काय म्हणाले होते सरसंघचालक मोहन भागवत?
मोरोपंत पिंगळे यांच्या पंचहत्तरीची आठवण सांगत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सूचक वक्तव्य केले. नागपुरात वनामती सभागृहात संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी दिवंगत मोरोपंत पिंगळेंच्या जीवनावरील इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी मोरोपंत पिंगळे यांच्या पंचहात्तरीची आठवण सांगताना सरसंघचालक म्हणाले की, वृंदावन येथे आयोजित संघाच्या एका बैठकीत मोरोपंत पिंगळेंच्या पंच्याहत्तरीनिमित्त त्यांचा सत्कार करण्याचे ठरले. त्यावेळी तत्कालीन सरकार्यवाह हो.वो. शेषाद्री यांनी मोरोपंतांचा शाल पांघरून बहुमान केला.
त्यावेळी मोरोपंत म्हणाले होते की, 'पंच्याहत्तरीचा अर्थ मला कळतो. माणसाची पंच्याहत्तरी झाली की, आपण बाजुला होऊन इतरांना संधी दिली पाहिजे', असे मोरोपंत तेव्हा म्हणाले होते, अशी आठवण सरसंघचालकांनी यावेळी सांगितली.












Click it and Unblock the Notifications