आणीबाणीत जे घडलं, तेच या 10 वर्षात घडतयं! मोदी शहा थडग्यावरची माती काढताहेत - संजय राऊत
मुंबई - 25 जून हा दिवस यापुढे संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याचे मोदी सरकारने ठरवले. पण 2014 ते 2024 या काळातील आणीबाणीचे काय?, भविष्याचा विचार धूसर झाला की राजकारणी भूतकाळात पळतात. म्हणूनच 50 वर्षांनंतर मोदी-शहा आणीबाणीच्या थडग्यावरची माती उकरून काढत आहेत अशी जळजळीत टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केली.
'सामना'च्या रोखठोक सदरात संजय राऊत यांनी आणीबाणीविषयीच्या आपल्या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आसूड ओढला.

या 10 वर्षात आणीबाणीच!
आणीबाणीच्या कालात जे घडले तेच आता घडत आहे. या दहा वर्षात हे घडत आहे, तरीही आणीबाणीतील काळाच्या अनुशंगाने २५ जून संविधान हत्या दिवस केंद्र सरकार पाळत आहे, एका अर्थाने या सरकारमधील मोदी-शहांच्या मानेवर आणीबाणीची भुताटकी अशाच पद्धतीने बसली आहे अशी टीका राऊत यांनी केली.
50 वर्षांपुर्वीच्या कळा आज येताहेत..
संजय राऊत यांनी नमूद केले की, दहा वर्षांतील मोदी व शहा यांचा राज्य कारभार हा संविधानाचा आदर करणारा नाही. इंदिरा गांधी यांनी उघडपणे लादलेल्या आणीबाणीपेक्षा तो खतरनाक आहे, आणीबाणीत राजकीय विरोधकांना देशद्रोही ठरवण्याचा प्रकार झाला. तो प्रकार आजही सुरूच आहे. मोदी व शहा यांना 50 वर्षांपूर्वी संविधानाची हत्या झाल्याच्या कळा आज येऊ लागल्या, कारण त्याच संविधानामुळे नरेंद्र मोदी हे आज लोकसभेत बहुमत गमावून बसले.
मोदी-शहांच्या पायाखालची वाळू सरकली
संजय राऊत यांनी म्हटले की, मोदी-शहांच्या राजवटीत संविधानाची हत्या रोजच झाली व मोदी यांनी चारशे पारचा नारा दिला. तो खरा ठरला तर मोदी भारताचे संविधानच बदलून टाकतील, असे विरोधकांनी प्रचारात सांगितले व जनतेने त्यावर विश्वास ठेवला. संविधान वाचविण्यासाठी जनतेने मतदान केले. परिणामी मोदी-शहांच्या पायाखालची बहुमताची सतरंजी लोकांनी ओढून घेतली. त्यामुळे 50 वर्षांपूर्वीची आणीबाणी भाजपने पुन्हा राजकारणात आणली.
ते थडग्यावरील माती उकरत आहेत..
25 जून हा यापुढे देशात संविधान हत्या दिवस म्हणून पाळला जाईल, असे गृहमंत्रालयाने वटहुकूम काढून जाहीर केले आहे. सध्याचे गृहमंत्री अमित शहा यांना आपल्या संविधानाविषयी इतका आदर व चिंता वाटतेय हे पाहून जयप्रकाश नारायण यांचा आत्मा स्वर्गात आनंदित झाला असेल. 25 जून 1975 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादली. त्या घटनेस आता 50 वर्षे उलटून गेली. तरीही मोदी व शहा या भूतकाळाच्या थडग्यावरील माती उकरताना दिसत आहेत.
आणीबाणी लादण्याची वेळ का आली?
संजय राऊत यांनी आणीबाणी लादण्याची वेळ पंतप्रधान इंदिरा गांधींवर का आली? असा सवाल उपस्थित करत उत्तरही दिले. ते म्हणाले, ही वेळ आल्याचे कारण म्हणजे त्या काळात चरण सिंग, जॉर्ज फर्नांडिस, जयप्रकाश नारायण यांची भाषा चिथावणीची व बंडाची होती.
"पोलिसांनी सरकारचे आदेश पाळू नयेत किंवा सैनिकांनी सरकारविरुद्ध द्रोह करावा," अशी चिथावणी रामलीला मैदानावरून उघडपणे देण्यात आली. यावर त्यावेळच्या पंतप्रधानांनी बघ्याची भूमिका घ्यायला हवी होती, असे वाटते काय? असा सवालही त्यांनी केला.
या १० वर्षातही आणीबाणीपेक्षा वेगळे काय?
1972 च्या जुलैत कर्नाटकातील तिप्पगोंडनहळ्ळी गावात एका सभेत जयप्रकाश नारायण म्हणाले, "एकाच व्यक्तीच्या हाती सत्तेचे केंद्रीकरण होणे ही देशाच्या व लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे." आज सत्ता एकाच्याच हाती एकवटली आहे, हे खरे नाही काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला. 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली तो काळ व मोदी यांचा मागच्या दहा वर्षांतील सत्ताकाळ पाहिला तर जे आणीबाणीत घडले तेच जसेच्या तसे आजही घडताना दिसत आहे.
तेव्हा संघ कोठे होता?
संजय राऊत म्हणाले की, भाजप म्हणजे तेव्हाचा जनसंघ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातही नव्हता व आणीबाणीबाबत त्यांची भूमिका दुटप्पी होती. आणीबाणीचा दिवस संविधान हत्या दिवस असे जाहीर करण्याआधी अमित शहा यांनी आणीबाणीत संघाची भूमिका समजून घ्यायला हवी होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचे खुले समर्थन तेव्हा केले.
आणीबाणी म्हणजे संविधानाची हत्या असे तेव्हा शिवसेनाप्रमुखांना वाटले नव्हते. उलट या निमित्ताने देशाला शिस्त लागत आहे असेच शिवसेनाप्रमुखांचे मत होते. आणीबाणीस पाठिंबा देणाऱ्या शिवसेनाप्रमुखांचे फोटो वापरून मोदी व त्यांचे तोडफोड मंडळ आज मते मागताना पाहणे ही गंमतच आहे.
कसली हत्या?
25 जून हा संविधान हत्या दिवस म्हणून पाळणे हीच संविधानाची हत्या ठरेल. गेल्या दहा वर्षांतील मोदी व शहा यांचा राज्य कारभार हा संविधानाचा आदर करणारा नाही व इंदिरा गांधी यांनी उघडपणे लादलेल्या आणीबाणीपेक्षा तो खतरनाक आहे. आणीबाणीत राजकीय विरोधकांना देशद्रोही ठरवण्याचा प्रकार झाला. तो प्रकार आजही सुरूच आहे. 1975 ची आणीबाणी जास्तच मनमानी पद्धतीने आज देशात वावरताना दिसत आहे. मग संविधान हत्येचा नेमका दिवस कोणता? असा मार्मिक सवाल संजय राऊत यांनी केला.












Click it and Unblock the Notifications