आम्ही सिनेमे काढल्यास त्यांना तोंड लपवून फिरावे लागेल - या नेत्याचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
आनंद दिघे यांच्या मनात त्यांच्याविषयी (एकनाथ शिंदे) काय होते हे आम्हाला माहीत आहे. आम्ही जर सिनेमे काढले तर त्यांना (एकनाथ शिंदे) तोंड लपवून फिरावे लागेल, असा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार तथा ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
माध्यमांशी आज संजय राऊत यांनी संवाद साधला, त्यावेळी राऊत यांनी एकनाथ शिंदे, भाजप आणि अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा यावर परखड मतं व्यक्त केली. तसेच महाराष्ट्रात कुणीही आले तरी महाविकास आघाडीच निवडणूक जिंकणार हा दावा केला.

...हा तर बाळासाहेब ठाकरे दिघेंचा अपमान
संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे म्हणतात की, इमानाने जगा. जर बेईमान लोक आनंद दिघेंना गुरु मानून खोटे चित्र उभे करीत असतील तर आनंद दिघे यांचाही अपमान आहे आणि आनंद दिघेंचे गुरु बाळासाहेब ठाकरे यांचाही अपमान आहे. काही वाक्य आनंद दिघे यांचे आहे असे दाखवून ते त्यांची राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न कराल पण तुम्ही लक्षात ठेवा त्या आगीत तुम्हाला चटकेच बसल्याशिवाय राहणार नाही.
चित्रपट भंपक, बोगस
संजय राऊत म्हणाले, आनंद दिघे यांचा संपूर्ण कालखंड आम्ही पाहीला आहे. आनंद दिघे यांच्या नावावर खोट्या गोष्टी खपवल्या जात आहेत. आनंद दिघे यांचे हिंदुत्व हे बाळासाहेब ठाकरेंचे हिंदूत्व आहे. ते वेगळे हिंदुत्व नव्हते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच हिंदुत्व आम्ही सर्वांनी स्वीकारले. हिंदुत्वाच्या ते ज्या वेगळ्या चुली मांडत आहेत त्या आनंद दिघे यांनी मानलेल्या नाहीत. चित्रपट बोगस आणि भंपक आहे.
आपल्या खोटेपणावर पांघरुन घालण्यासाठी असे चित्रपट काढले जात आहेत. याआधी काश्मीर फाईल, ताश्कंद फाईल हे चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले. आपल्या खोट्या भुमिकांना सत्याचा मुलामा देण्यासाठी त्यांनी हा वापर केला.
..तर दुसरा भाग कसा?
संजय राऊत म्हणाले, जे खोटे आहे त्याची चिंता आपण का करावी. पहिल्या चित्रपटात आनंद दिघे यांचे महानिर्वाण दाखवले आहे. त्यानंतर दुसरा भाग कसा येऊ शकतो? पण विधानसभा निवडणुकीत खोट्याला उजाळा देण्यासाठी आपल्या बेईमानीवर तारे चमकवायचे आहे, त्यासाठी आनंद दिघेंसारख्या महान निष्ठावान नेत्यांचा वापर करायचा हा त्यांचा डाव आहे. धर्मवीरांचे नाव घेण्याचे त्यांना (एकनाथ शिंदेंना) काहीही अधिकार नाही. ते बाळासाहेब ठाकरेंसोबत इमानदार होते. त्यांचे नाव कुणी स्वार्थासाठी घेत असेल तर ती बेईमानी आहे.
अमित शहांना जोरदार टोला
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात वा कुठे जायचे हा अमित शहांचा प्रश्न आहे, ते देशाचे गृहमंत्री आहेत, जम्मू काश्मीरात रोज जवानांवर हल्ले होत आहेत, मणीपूर पेटलेले आहे. युपीत शांतता नाही तरीही राजकीय कारणांसाठी देशाचे गृहमंत्री पक्षाच्या मंडपात बसून राहतात. हे चित्र चांगले नाही. महाराष्ट्रात राजकीय लक्ष घालण्यापेक्षा मणीपूर, काश्मीरात लक्ष घातले तर गृहमंत्रीपद सार्थकी लागेल.
कुणालाही बोलवा आमचेच सरकार
संजय राऊत म्हणाले, राज्यातील निवडणुकांवर दबाव आणण्यापेक्षा अतिरेक्यांवर दबाव आणा. त्यांना खतम करा. गृहमंत्र्यांनी राज्यात ठाण मांडू द्या की, पंतप्रधानांनी सभा घेऊ द्या, ट्रम्प अथवा पुतीन यांना बोलवा या राज्यात उद्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता! -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं?








Click it and Unblock the Notifications