छपन्न इंच नव्हे..ती छाती नाही! माचिसचा रिकामा खोका, निवडणुकीतून हवा काढली - PM मोदींवर राऊतांची टिका
"छपन्न इंच नव्हे..ती छातीच नाही! माचिसचा रिकामा खोका आहेे, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छपन्न इंच छातीची लोकसभा निवडणुकीतून हवा काढली असा जोरदार टोला शिवसेना युबीटी पक्षाचे नेते संजय राऊत यांनी PM नरेंद्र मोदी यांनी लगावला.
महाविकास आघाडीचा आज मुंबईत संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने या मेळाव्याला सुरुवात झाली. संजय राऊत यांनी देखील या मेळाव्यात केंद्रातील एनडीए सरकार तसेच महायुती सरकारवर सडकून टीका केली,

लाडकी बहिण योजनेचं ढोंग महाराष्ट्रात
सजंय राऊत म्हणाले लाडकी बहिण योजनेसारखी ढोंगी योजना कोणतीही नाही कारण, सरकारी पैशातून जाहिराती केल्या जात आहेत. ही योजना म्हणजे सरकार पैशाने विकत घेण्याची योजना आहे, या सरकारला कसं कळणार की नाती पैसाने विकत घेता येत नाहीत, हे नातं पैशाच्या पलीकडचे असतं.
सध्याची भाजपा बनावट
संजय राऊत म्हणाले की, सध्याची भाजपा ही बनावट भाजपा आहे, शिवसेनेची जी युती होती ती अटलबिहारी वाजपेयींच्या ख-या भाजपासोबत होती. आज त्यांची पुण्यतिथी आहे. अटल बिहारी यांचीच कवितेच्या ओळी हार नहीं मानूंगा, रार नई ठानूंगा, ध्यानात घेऊन आम्ही पुढे जात आहोत. लोकसभेला दिल्लीचा कप जिंकला आहे आता विधानसभेलाही महाराष्ट्राचा सामना जिंकू
पंतप्रधानांना छातीच नाही
राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना म्हटले की, महाराष्ट्र हा कधी दिल्ली समोर झुकणार नाही, मोडणार नाही, पण तुम्हाला मोडल्याशिवाय राहणार नाही. आधी म्हटलं जायचं की 56 इंच की छाती आहे पण त्यांना छातीच नाही हे उघड झाले आहे कारण, त्यांना नुसती छाती जरी असती तर देशाची अवस्था अशी झाली नसती. पंतप्रधान लाल किल्ल्यावर भाषण देत असतानाच तिकडे काश्मीरमध्ये आपले जवान शहीद झाले मग त्यांना छाती आहे असं कसं म्हणता येईल, महाराष्ट्राने लोकसभेला त्यांच्या छातीतील होती ती हवा काढून घेतली आहे.
अजित पवारांवर टीका
अजित पवारांवर टीका करताना संजय राऊत म्हणाले की सुप्रिया सुळे महाराष्ट्राची लाडकी बहिण आहे, सगळा महाराष्ट्र तिच्यासाठी बारामतीच लढला. त्यामुळे भावाने रंग बदलला, ते पिंक झाले, सरडयाने रंग बदलवा तसा तो बदलला. हा भाऊ बारामती सोडणार आहे असे कळते पण कुठे जाणार आहे हे माहित नाही.
गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिणा नाही
राऊत आपल्या भाषणात म्हणाल की, गुलाबी रंग हा महाराष्ट्राला धार्जिणी नाही, आपला रंग भगवा आणि तिरंगा. तेलंगणातील केसीआर गुलाबी रंग घेऊन महाराष्ट्रात आले होते त्यांनी मी सांगितले की असा रंग नका आणू, पुढे काय झालं आपणा सर्वांना माहितीच आहे.
मविआत कोणतेही वाद नाहीत
महाविकास आघाडी उत्तम रितीने पुढे चाललेली आहे, आमच्यात कोणतेही वाद नाहीत, जर वाद असते तर आम्ही लोकसभा निवडणूक जिंकलो नसतो. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आम्हाला शिकवते की महाराष्ट्राच्या शत्रुशी एकोप्याने लढायचे आणि जे शत्रुला साथ देतील त्यांना ठोकून काढायचे. त्यामुळे खोकेधारकांना विधानसभेत जाऊ द्यायचे नाही, उद्या आमची सत्ता येणार आहे, तिजोरीत जरी खडखडाट असला तरी पैसे कसे जमा करायचे हे जयंत पाटलांना चांगलंच माहिती आहे, कारण ते अर्थमंत्री राहिले आहेत. असेही राऊत यांनी सांगितले.
भाजपची ब्रिटिशांसारखी निती
ब्रिटिशांनी भारतीयांमध्ये फूट पाडून राज्य केले तीच फोडा आणि झोडा निती भाजप महाराष्ट्राच्या बाबतीत राबवत आहे. पण तुम्ही किती फोड आणि झोडा निती अवलंबली तरी आमची एकी तुटणार असे संजय राऊत यांनी मेळाव्यादरम्यान ठणकावून सांगितले.












Click it and Unblock the Notifications