पालकमंत्रीपदाला स्थिगीती हा मुख्यमंत्र्यांचा अपमान; संजय राऊतांनी सांगितली फडणवीसांची हतबलता
काही दिवसांपूर्वी पालकमंत्रीपदाची घोषणा झाली. मात्र त्यानंतर दोन पालकमंत्रीपदावरुन महायुतीत वाद झाले. या नाराजीनाट्यानंतर नाशिक व रायगड या दोन पालकमंत्रीपदाच्या निवडीला स्थगिती देण्यात आली. सरकारला त्यासाठी नवा जीआर काढावा लागला. आता याच विषयावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुती व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

संजय राऊतांचा निशाणा
रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन शिंदे गटाचे नेते भरत गोगावले नाराज झाले. दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्रीपदावरुन दादा भुसेही नाराज झाले. या दोन्ही नेत्यांकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. हा वाद चांगलाच रंगला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात गेल्यावर या निवडीला तातडीने स्थगिती देण्यात आली. यावरुन संजय राऊत यांनी आज महायुतीवर निशाणा साधला.
काय म्हणाले राऊत?
प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, पालकमंत्रीपदाला थेट दिल्लीतून स्थगिती आणली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेव्हा परदेशात होते. ते नसताना ही खेळी करण्यात आली. आता नवीन जीआर काढून रायगड व नाशिकचे पालमंत्रीपद स्थिगीत ठेवण्यात आले. महायुतीच्या अंतर्गत ही मोठी खेळी झाली, असा आरोप त्यांनी केला.
फडणवीसांचा अपमान
राऊत पुढे म्हणाले, पालकमंत्रीपदाची लढाई हे बिनडोकपणाचे लक्षण आहे. मात्र तरीही ही लढाई सुरु आहे. ते परदेशात असताना थेट दिल्लीवरुन सुत्रे हालवून खेळी खेळण्यात आली. आता मुख्यमंत्री हतबल आहेत. हा त्यांचा अपमान आहे. मात्र तरीही ते सहन करत आहेत. ते परदेशात असताना हे सगळं करण्यात आलं, असं म्हणत राऊतांनी फडणवीसांनाही टोला लगावला.
महायुतीवर टीका
राऊत पुढे म्हणाले, सत्ता येऊनही त्यांच्यात एकवाक्यता नाही. पालकमंत्रीपदासाठी रायगड, नाशिकमध्ये काहींच्या समर्थकांनी आंदोलने केली. हे त्यांच्या-त्यांच्यातच सुरु आहे. पालकमंत्रीपदासाठी थेट टायर जाळली गेली. धमक्या दिल्या गेल्या.हे सगळं बिनडोपणाचं राजकारण सुरु आहे, असा आरोपही राऊत यांनी केला.












Click it and Unblock the Notifications