अजित पवारांचा काटा काढण्याचा भाजपचा प्लॅन, शिंदेंनाही मुख्यमंत्रीपदावरुन हटविण्यासाठी हालचाली: राऊत
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने अजित पवार यांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरु केलेला आहे, यात शिंदे गटातील काही लोक सामिल आहेत पण निवडणुकीनंतर शिंदे गटाचाही काटा काढला जाणार आहे, भाजपवर कोणीही विश्वास ठेवू नये, कारण त्यांनी आजपर्यंत त्यांच्या मित्रपक्षांना संपविले आहे. असे वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, भाजप आणि शिंदे गट एकनंबरचे कपटी आणि कारस्थानी लोक आहेत. भाजपवर कोणी विश्वास ठेवू नये ते आपल्या जवळच्याच मित्रांचा काटा काढतात आज अजित पवारांचा आणि निवडणुकीनंतर शिंदे गटाचा काटा काढतील. ते निर्दयी लोक आहेत. त्याचा अनुभव आम्ही आणि देशातील त्यांच्या अनेक मित्रपक्षांनी घेतला आहे. अजित पवार यांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरु झालेला आहे. आणि यामध्ये मिंधे गटाचे काही लोक सामिल आहेत.

एकदा का अजित पवारांना बाहेर काढले की आपापल्या वाट्याला लढण्यासाठी जास्त जागा येऊ शकतात हे त्यातील राजकारण आहे. पण अजित पवार हे त्यांच्या काकांशी बेईमानी करुन, धोका पत्करुन भाजपसोबत आलेले आहेत. पण आता गरज सरो वैद्य मरो ही भुमिका असल्याने अजित पवारांना अडचणीत आणणारी वक्तव्ये, भुमिका दोन्ही गटाकडून घेतल्या जात आहेत. पहिला बळी जर अजित पवारांचा जाणार असेल तर दुसरा बळी हा शिंदे गटाचा जाईल.
एकनाथ शिंदेंनाही निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरुन हटवण्याच्या हालचाली
राऊत पुढे म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आहे, पण भविष्यात महाराष्ट्रातील नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे राहू नये, यासाठीही भाजपच्या नेत्यांनी दिल्लीत हालचाली सुरु केल्या आहेत. दिल्लीतून भाजपच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राच्या निवडणुकीचा सगळा खर्च करण्याचे आदेश दिले आहेत. झारखंड आणि हरियाणाच्या निवडणुकीचा खर्चही एकनाथ शिंदे यांच्याकडून करुन घेतला जात आहे. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद हे याच पैशांवर टिकून आहे. त्यासाठी राज्यात लुटमार सुरु आहे. एकनाथ शिंदे यांना हजारो कोटी रुपये गोळा करुन त्या थैल्या दिल्लीतील गुजराती व्यापारी मंडळाला द्याव्या लागतात,असाही घणाघात राऊत यांनी केला.












Click it and Unblock the Notifications