गद्दारांचा सन्मान हा मराठी अस्मितेला धक्का; पवारांनी शिंदेंचा सत्कार करताच संजय राऊत भडकले
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारा असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच दिल्लीत होणारे साहित्य संमेलन हे दलाल व भ्रष्टाचाऱ्यांचे संमेलन असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळ्यात शिवसेनेचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव' पुरस्काराने सन्मान केला. त्यांच्या या कृतीमुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत चांगलेच संतप्त झाले. यावर ते सकाळी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवारांवर चांगलेच भडकले. राज्याचे राजकारण हे फार विचित्र दिशेने जात आहे. कोण कुणाला टोप्या घालत आहे आणि कोण कुणाच्या टोप्या उडवत आहे, कोण कुणाला गुगली टाकत आहे आणि कोण स्वतः हीट विकेट होत आहे हे पुन्हा एकदा समजून घ्यावे लागेल, असेही राऊत म्हणाले.

शरद पवारांनी शिंदेंच्या कार्यक्रमाला जायला नको होते
ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे सरकार पाडले, बेईमानी केली, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते ही आमची भावना आहे. महाराष्ट्रातल्या लोकांपुढे आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात कुणी कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो हे ठीक आहे. पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआमपणे जाऊन बसलेत, त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणे हे महाराष्ट्राच्या अस्मितेला व स्वाभिमानाला धक्का लावणारे आहे असे आम्हाला वाटते. कदाचित शरद पवारांची भावना वेगळी असेल. पण महाराष्ट्राच्या जनतेला हे काही पटले नाही.
आम्ही अजित पवारांवषयी भान राखतो
शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, अमित शहांच्या सहकार्याने फोडली व महाराष्ट्र कमजोर केला, अशांना आपण सन्मानित करता, यामुळे मराठी माणसांच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या आहेत. आम्हाला तुमचे दिल्लीतले राजकारण माहिती नाही. आम्हालाही राजकारण कळते. पण काल जे काही झाले ते पाहून आम्हाला नक्कीच वेदना झाल्या आहेत. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. तुमचे व अजित पवारांचे गुफ्तगू होत असेल. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न असेल. पण तरीही आम्ही अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला, तुमचे कुटुंब फोडले म्हणून याचे भान राखून आम्ही आमचे पाऊले टाकत असतो.
शिंदेंमुळे ठाण्याची वाट लागली
ठाण्याचे राजकारण योग्य दिशेने नेण्याचे मोठे काम एकनाथ शिंदे यांनी केल्याचे कौतुक शरद पवारांनी केले आहे. पत्रकारांनी ही बाब संजय राऊत यांच्या निदर्शनास आणून दिली असता ते म्हणाले की, हे खोटे आहे. शरद पवारांकडे चुकीची माहिती आहे. ठाण्याचे राजकारण योग्य दिशेने नेण्याचे काम मागील 30 वर्षांत ठाकरेंच्या शिवसेनेने केले आहे. त्यांना माहिती नसेल तर सांगतो ठाण्याचा विकास हा सतीश प्रधान यांच्या काळात झाला. आज ठाण्यात जे काही दिसत आहे ते सर्वकाही बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पना होत्या. सतीश प्रधान यांना विकासाची एक दृष्टी केली. त्यांनी टेंडरबाजी केली नाही. त्यानंतर शिवसेनेचे अनेक महापौर झाले. एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या राजकारणात फार उशिरा आले. शरद पवारांना हे माहिती हवी असेल तर आम्ही आमचे ठाण्यातील प्रमुख कार्यकर्ते राजन विचारे त्यांच्याकडे माहिती देण्यासाठी पाठवू. एकनाथ शिंदे हे फार उशिरा आमदार झाले. विधानसभेत आले. त्यानंतर ठाण्याची वाट लागण्यास सुरुवात झाली.
महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्यांचा सत्कार
मुंबईतील व्यावसायिक तथा शस्त्रास्त्र डीलर अभिषेक वर्मा यांनी नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. संजय राऊत यांनी यावरूनही शरद पवार व एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. शरद पवारांनी काल शिंदेंचा सत्कार केला. त्यामुळे त्यांनीच त्याचे उत्तर दिले पाहिजे. तो ही महादजी शिंदे यांच्या नावाने सत्कार केला. शिंदेंचा पक्ष म्हणजे अमित शहांचा पक्ष आहे. त्यामुळे त्यांनीही त्याचे उत्तर दिले पाहिजे. त्यांना देशद्रोहाचा आरोप असणारे चालत आहेत. काल पवारांनी शिंदेंचा नव्हे तर महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचे उद्योगधंदे पळवून नेणाऱ्या अमित शहांचा सत्कार केला. आणि हे जे काही तुम्ही नावे घेत आहात, दलाल, भ्रष्टाचाऱ्यांचे, देशद्रोही आदींचे ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत. त्यांच्या मुखियाचा सत्कार शरद पवार करत आहेत.
हे साहित्य संमेलन नसून राजकीय दलाली
संजय राऊत यांनी यावेळी दिल्लीतील साहित्य संमेलनावरही टीका केली. ते म्हणाले, हा मुद्दा नाराजी व्यक्त करण्याचा नाही. या आमच्या पक्षाच्या भावना आहेत. दिल्ली सुरू असणारे साहित्य संमेलन हे साहित्य संमेलन नसून राजकीय दलाली आहे. तिथे दलालीच सुरू आहे. कुणालाही कसेही पुरस्कार देत आहेत, कुणाचाही कसाही सत्कार करत आहेत. या लोकांचा साहित्याशी संबंध काय? माझा आयोजकांना प्रश्न आहे, तुम्ही दिल्लीत दलाली करण्यासाठी आला आहात का? तुम्ही साहित्याची कोणती सेवा करत आहात? कोण करत आहे हे साहित्य संमेलन आयोजित? हा भाजपचा एक उपद्व्याप आहे. काय चालू आहे मराठीची सेवा? महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणाऱ्या लोकांचा इथे सत्कार केला जात आहे? कोण करत आहे हे सगळे? यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. हे साहित्य संमेलन नसून, दिल्लीतील दलाली आहे. आम्ही या संमेलनाला जाणार नाही, असेही संजय राऊत यावेळी संतप्त सूरात म्हणाले.












Click it and Unblock the Notifications