जागावाटपावरुन काँग्रेस अन् ठाकरे गटात जुंपली; राऊतांचा आक्रमक पवित्रा, गांधींकडे पटोलेची तक्रार
लोकसभेला काँग्रेस व ठाकरे गटात वाद झाला होता. आता तसाच वाद विधानसभा जागावाटपातही होताना दिसतोय. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून काँग्रेस व ठाकरे गटात घमासान सुरू असल्याचं चित्र आहे.
मविआकडून 260 जागांवर बोलणी पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत असला, तरी अजूनही 25 ते 30 जागांवर जोरदार रस्सीखेच सुरु आहे. विदर्भातील जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये वाद झाल्याच्याही चर्चा आहेत. वाढीव जागांसाठी ठाकरे गट आग्रही असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भात जागा न सोडण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कालच्या बैठकीमध्ये संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये खटके उडाल्याची चर्चा आहे.

पटोले व संजय राऊतांमध्ये जुंपली
विदर्भातील जागांवरुन काँग्रेस व ठाकरे गटात सध्या धुमशान सुरु आहे. काल गुरुवारी जागावाटपाबाबत झालेल्या बैठकीत नाना पटोले व संजय राऊत यांच्यात खटके उडाल्याच्या चर्चा आहेत. विदर्भातील जागांसाठी ठाकरे गट आग्रही आहे. त्यामुळे जागावाटपाची चर्चा पुढे जात नसल्याचे चित्र आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेविरोधात ठाकरे गटाने थेट काँग्रेसच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली. निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने लवकरात लवकर जागा वाटपाचा निर्णय व्हावा, असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. मात्र असे असताना नाना पटोले यांची भूमिका अडचणीचे असल्याचं ठाकरेंच्या नेत्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उच्चस्तरीय नेतृत्वाकडे ठाकरे गटाकडून तक्रार करण्यात आली आहे. तत्काळ निर्णय घेऊन जागावाटप पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
जागा वाटपासंदर्भात संजय राऊत म्हणाले की, लवकरात लवकर जागा वाटपाचा तिढा सुटण्यासाठी मी आज राहुल गांधी यांच्याशी बोलणार आहे. काँग्रेस सरचिटणीस वेणुगोपाल यांच्याशी माझं बोलणं झालं असून महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासोबतही बोलणं झालं आहे. आम्ही रामटेकसारखी सहा वेळा निवडून आलेली जागा, काँग्रेसला दिली. अमरावतीची सुद्धा जागा आम्ही दिली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या जागा आम्ही दिल्या, त्या जिंकल्या सुद्धा आहेत. त्यामुळे तेथील कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्यायला हव्यात. त्यामुळे विधानसभेला आम्हाला अधिक जागा मिळायला हव्यात हे समजून घ्यायला हवं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications