चीन, ट्रम्प यांचे नाव घेण्यास सरकारची "हातभर का फाXX!; संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut Latest News : नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत-पाक युद्धासंदर्भातील दाव्याला प्रत्युत्तर देण्यास पंतप्रधान मोदी धजावत नाहीत, तसेच संसदेत ट्रम्प आणि चीनचे नाव घेण्यासही ते घाबरतात, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला. यावेळी त्यांनी भाजपवर विविध मुद्द्यांवरून टीकेचे आसूड ओढले.
डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचा मुद्दा
संजय राऊत यांनी भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या भारत-पाक युद्ध थांबवल्याच्या दाव्याचा उल्लेख केला. या दाव्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदी का धजावत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संसदेतही मोदी ट्रम्प आणि चीनचे नाव घेण्यास घाबरतात, अशी टीका त्यांनी केली. मंगळवारी लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर'बाबत झालेल्या चर्चेचा दाखला देत राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

भ्रष्टाचाराचा मुद्दा: राष्ट्रपतींकडे दाद मागणार
महाराष्ट्रातील भ्रष्ट मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले की, जर सरकार निर्लज्ज असेल आणि भ्रष्टाचाराला पाठिंबा देत असेल, तर भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे कसे होणार? विरोधी पक्ष म्हणून आम्ही काल राज्यपालांची भेट घेतली असून, सर्व भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या फायली घेऊन पुढील आठवड्यात राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. मुख्यमंत्री आणि राज्यपाल या मंत्र्यांवर कारवाई करत नाहीत, त्यामुळे राष्ट्रपतींकडे दाद मागण्याची वेळ आल्याचे त्यांनी नमूद केले.
कृष्णा आंधळे प्रकरण: सरकारवर प्रश्नचिन्ह
संतोष देशमुख प्रकरणात मुख्य साक्षीदार असलेला कृष्णा आंधळे याचे काय झाले, तो कुठे गायब झाला, मारला गेला की त्याची हत्या झाली, हे महाराष्ट्राला कळू द्यावे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम पोलीस यंत्रणेतही या प्रश्नांची उत्तरे मिळत नसल्याचे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
राज्यात 'फडणवीस ॲक्ट' लागू: राऊतांचा टोला
महाराष्ट्रात 'समज द्या आणि सोडून द्या' असा नवा 'फडणवीस कायदा' आला असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला. काल काही मंत्र्यांना समज देऊन सोडून दिल्याचे त्यांनी उदाहरण दिले. बाकी सर्वांवर कायदेशीर कारवाई होईल, जन सुरक्षा कायद्यांतर्गत त्यांना अटक केली जाईल; मात्र मंत्रिमंडळातील संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, संजय राठोड यांसारखे आरोपी कारागृहात असण्याऐवजी बाहेर आहेत आणि जे बाहेर हवेत ते कारागृहात आहेत, कारण राज्यात 'फडणवीस ॲक्ट' लागू आहे, असे राऊत म्हणाले.
शिंदे गटाला इशारा?
एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या लोकांभोवती फास आवळला जात असल्याचे दिसून येत असले तरी, यावर मत व्यक्त करणे योग्य नाही, कारण हे सर्व दबावाचे राजकारण आहे, असे संजय राऊत म्हणाले. अमित साळुंके आणि वसई-विरारचे प्रकरण हा शिंदे गटाच्या लोकांसाठी 'याद राखा काही हालचाल कराल तर सर्व फायली टेबलावर आहेत' असा इशारा आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
संसदेतील 'रुदाली' भाषण
काल संसदेत 'ऑपरेशन सिंदूर'बाबत चर्चा सुरू असताना केंद्र सरकारला विरोधकांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे विरोधकांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर नव्हते. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची जोरदार भाषणे झाली, तर पंतप्रधान मोदींचे भाषण देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेत सांगायचे झाले तर 'रुदाली' होती, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.












Click it and Unblock the Notifications