DGP रश्मी शुक्ला यांची नेमणूक बेकायदेशीर, भाजप विरोधात काम करणाऱ्यांना त्या धमक्या देतात - संजय राऊत
राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची नेमणूकच बेकायदेशीर आहे. भाजप विरोधात काम करणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना त्या धमक्या देत आहेत, खोटे गुन्हे दाखल करुन त्या पोलिसांना चुकीचे कामं करण्याचे आदेश देत आहे, तरी देखील निवडणूक आयोग गप्प बसले असून त्यांची बदली केली जात नाही, फडणवीस व केंद्र सरकारच्या मदतीने रश्मी शुक्ला या राज्यातील पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. ते शुक्रवारी माध्यमांशी बोलत होते.
रश्मी शुक्ला यांची नेमणूकच बेकायदेशीर
संजय राऊत म्हणाले की, राज्यात आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे. यासंदर्भात नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली, ती योग्य आहे. परंतु तरी देखील निवडणूक आयोग पारदर्शकतेच्या दृष्टीने काम करु पाहत नाही. पोलिस महासंचालकपदी बसलेल्या व्यक्ती अर्थात रश्मी शुक्ला यांची नेमणूकच बेकायदेशीर आहे. त्यांचा इतिहास पाहता त्या भाजप विरोधी काम करणाऱ्यांवर कारवाईचे बेधडक आदेश देत आहेत.

संजय राऊत म्हणाले की, डीजीपी रश्मी शुक्ला यांचा इतिहास पाहिला तर त्यांनी महाविकास आघाडीच्या काळात देखील आमच्या नेत्यांचे सर्वांच्या फोन टॅपिंग करून फडणवीसांना हवी ती माहिती देण्याचे काम केले. एकीकडे निवडणूक आयोग झारखंडच्या पोलिस महासंचालकांची बदली करते. मुळात त्या पोलिस महासंचालकांवर कोणताही आरोप नव्हता. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील पोलिस महासंचालकांवर गंभीर आरोप असून देखील त्यांच्यावर कारवाई होत नाही.
पोलिस दल दबावाखाली काम करतंय
राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे पोलिस दल दबावाखाली काम करतंय, त्यांना आदेश रश्मी शुक्ला देत आहेत. विशेषत: आमच्या शिवसैनिकावर तडीपारचे आदेश दिले जात आहेत. पारदर्शक निवडणूक करायची असेल तर रश्मी शुक्ला यांना हटवावे लागेल, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली तरी देखील त्यांच्यावर कारवाई होत नाही. प्रमुख कार्यकर्ते खोटे गुन्हे दाखल करुन तडीपार केले जात आहे. या बाईंचा दबाव खूप आहे. देवेंद्र फडणवीस व केंद्रसरकार रश्मी शुक्ला यांना पाठिंबा देतात. मुळात त्यांची नेमणूकच बेकायदेशीर आहे.
राज्यविरोधी काम करणाऱ्यांना राज ठाकरेंची साथ
माहिम मतदारसंघावरुन देखील संजय राऊत यांनी भाष्य केले. मुळात राज ठाकरे हे राज्याच्या विरोधात उभे असणाऱ्या पक्षांना मदत करतात, ही त्यांची जुनीच पद्धत आहे. दुसरीकडे दीपोत्सवाद्वारे राजकीय प्रचार होत असेल तर हा आचारसंहितेचे उल्लघंन आहे, असे म्हणत राऊतांनी अमित ठाकरेंवर देखील निशाणा साधला.
मतदार यादीत नावे
बोगस आधार कार्डच्या माध्यमातून हजारो बोगस नावे मतदार यादीमध्ये घुसवली जात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे भाजपचे सुरू असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. हा भाजप आणि त्यांचा आयटीसेलचा एक उपक्रम असतो. मात्र हे अत्यंत गंभीर आहे. याबाबत आम्ही वारंवार तक्रारी केल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications