दैव बलवत्तर म्हणून..! संजय राठोड यांच्या कारचा चक्काचूर, पहा नेमकं काय झालं...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळ दौऱ्याचं नियोजन करण्यासाठी गेलेल्या पालकमंत्री संजय राठोड यांच्या कारचा भिषण अपघात झाला. हा अपघात एवढा भिषण होता की, कारचा पुढचा भाग चक्काचूर झाला. गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, दैव बलवत्तर म्हणून संजय राठोड काही तास आधीच या गाडीऐवजी पाहुण्याच्या गाडीतून प्रवास करत होते. राठोड यांची कार अपघातग्रस्त कारच्या पाठीमागेच होते. अपघातानंतर सुमारे 15 ते 20 मिनिटांनी राठोड प्रवास करत असलेली कार अपघातस्थळी पोहोचली. कार बदलल्यामुळे राठोड हे या अपघातातून थोडक्यात बचावले.

नेमका कसा झाला अपघात?
कोपरा गावाजवळून कार जात असताना ही दुर्घटना घडली. कारने समोरच्या पिकअप व्हॅनला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. रस्त्यावरून दोन्ही गाड्या वेगाने जात असताना पिकअप व्हॅननं अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागून कारची जोरात धडक बसली. या अपघातात पिकअप व्हॅन पलटी झाली. यात पिकअप व्हॅनचा चालक जखमी झाला असून, अपघातानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघात झाला तेव्हा संजय राठोड त्यांच्या कारमध्ये नव्हते. ते दुसऱ्या एका कारमधून मागून येत होते. त्यांची कार पुढे निघाली होती. या अपघाताचा प्रभाव इतका प्रचंड होता की त्यात कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. या अपघातामध्ये संजय राठोड यांच्या कारचा चालक एअरबॅग्जमुळे बचावला आहे.
संजय राठोड थोडक्यात बचावले
संजय राठोड हे गुरुवारी यवतमाळहून वाशिममधील पोहरादेवी येथे गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच, पोहरा देवीच्या दर्शनासाठी यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत. त्याच्या नियोजनासाठी संजय राठोड पोहरादेवीहून परत येत असताना हा अपघात घडला. संजय राठोड त्यांच्या कारमधूनच प्रवास करणार होते. मात्र, ऐनवेळी नियोजन बदलल्यामुळे ते दुसऱ्या एका पाहुण्यांच्या कारमधून निघाले. त्यांची कार पुढे निघाली. अपघात घडल्यानंतर जवळपास १५ ते २० मिनिटांनी संजय राठोड प्रवास करत असलेली कार त्या ठिकाणी पोहोचली. त्यामुळे कार बदलल्यामुळे संजय राठोड थोडक्यात बचावले.












Click it and Unblock the Notifications