सना मलिकांना तिकीटाची लाॅटरी आरोपांच्या पिंजऱ्यात असलेल्या नवाब मलिकांचे पुढे काय होणार?
Sana Malik is the candidate from Anushaktinagar : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते नवाब मलिक यांना कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटक झाली. बराच काळ ते तुरुगांत होते त्यानंतर त्यांची वैद्यकीय कारणेही समोर आली आणि न्यायालयाकडून त्यांना काही अटींशर्थीवर जामीनही देण्यात आला पण त्यांना या विधानसभा निवडणुकीत अद्याप तिकीट मिळालेले नाही. त्यांची मुलगी सना मलिक यांना त्यांच्या जागी उमेदवारी देण्यात आली आहे.
सना मलिक जर अनुशक्तीनगर येथून लढणार असतील तर प्रश्न हा आहे की, नवाब मलिकांचे पुढे काय होणार. नवाब मलिक आणि सना मलिक हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. त्यामुळे एकाच घरात दोघांना तिकीट देतात का हे आता काही वेळात दिसणार आहे. कारण सना मलिक यांना एबी फाॅर्मही राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आला आहे.

नवाब मलिकांबद्दल काय म्हणाले अजित पवार?
अजित पवारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर केली. त्यादरम्यान भाजपच्या दबावामुळे नवाब मलिक यांना तिकीट न दिल्याचे वृत्त माध्यमांत झळकत आहे. यावर अजित पवार यांच्या पक्षाकडून स्पष्टोक्ती दिली गेली. अजित पवार यांनी असा दबाव वैगेरे काही नसल्याचे स्पष्ट केले. माध्यमांत जे वृत्त आले ते निराधार आहे, असे काहीही झालेले नाही, आज संध्याकाळी त्यांच्या उमेदवारीसंदर्भात एक बैठक होईल त्यानंतर आम्ही आमचा निर्णय कळवू. आतापर्यंत 45 उमेदवार घोषित केले आहेत, उरलेल्या उमेदवारात नवाब मलिक यांना तिकीट मिळेल अशी शक्यता आहे.
सना मलिक अणुशक्ती नगरमध्ये सक्रिय
अणुशक्ती नगरमध्ये सक्रिय असलेल्या त्यांच्या नेतृत्वाखाली ऑगस्ट महिन्यात अजित पवारांची जन सन्मान यात्रा यशस्वीपणे आयोजित केली होती. या ठिकाणी अजित पवार यांनी सना मलिक यांना पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून घोषित केले होते.
नवाब मलिक यांचे राजकारण
- नवाब मलिक यांनी अणुशक्ती नगरमधून दोनदा आणि नेहरू नगरमधून तीन वेळा निवडणूक जिंकली आहे.
- 2009 आणि 2019 मध्ये ते अणुशक्ती नगरमधून विजयी झाले.
- 1996, 1999, 2004 मध्ये त्यांनी नेहरू नगरमधून निवडणूक जिंकली.
- नवाब मलिक हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचा मुस्लिम चेहरा मानला जातो.
- राष्ट्रवादीत फूट पडण्यापूर्वी ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा होती.
- नवाब मलिक हे शरद पवार आणि अजित पवार या दोघांचे जवळचे मानले जातात.
- 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील निवडणुका
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान
महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी घोषित केले जातील. यावेळी थेट लढत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात आहे. दोन्ही आघाडीत जागावाटपाची जोरदार चर्चा सुरू आहे.












Click it and Unblock the Notifications