जंजाळांच्या हट्टापुढे पालकमंत्री झुकले? संभाजीनगरमध्ये युती तुटल्याची बॅक स्टोरी काय?
Sambhajinagar bjp shivsena alliance crisis: गेल्या अनेक दिवसांपासून शहराच्या राजकीय हवेत एकच चर्चा होती- 'जागावाटपाचं काय होणार?' पडद्यामागे भारतीय जनता पक्षाचे अतुल सावे, डॉ. भागवत कराड आणि शिवसेनेचे संजय शिरसाट (Sanjay Shirsat), प्रदीप जैस्वाल, राजेंद्र जंजाळ (Rajendra Janjal) यांच्यात बैठकांचे सत्र सुरू होते. पण, ३० डिसेंबर मंगळवारी सकाळी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद बोलावली आणि एका वाक्यात साऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला... "महायुती तुटली आहे!"

संघर्षाची ठिणगी आणि २९ जानेवारीचा तो प्रसंग
या वादाची खरी ठिणगी पडली ती २९ जानेवारीला. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ कॅमेऱ्यासमोर आले. पण त्यांचा अवतार वेगळा होता. भाजप आपल्या हक्काच्या ७ ते ८ जागांवर दावा करत असल्याचा आरोप करत, जंजाळ यांनी थेट निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली. ही केवळ माघार नव्हती, तर तो एक भावनिक उद्रेक होता. "कार्यकर्त्यांच्या संधीसाठी मी स्वतःला बाजूला सारतोय," असे म्हणताना जंजाळ यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि तिथेच या युतीचा शेवट लिहिला गेला.
जेव्हा कार्यकर्ते शिरसाटांच्या दारात धडकले...
जंजाळ यांचे ते अश्रू सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. शिवसेनेचा जुना आणि निष्ठावान कार्यकर्ता आक्रमक झाला. "युती तोडा, स्वाभिमान जपा" अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी थेट पालकमंत्री संजय शिरसाट यांचे निवासस्थान गाठले.
संजय शिरसाट यांच्यासमोर पेच मोठा होता. एकीकडे त्यांना 'महायुती' टिकवून विजयाचे गणित जुळवायचे होते, तर दुसरीकडे आपल्याच सैनिकांचा वाढता दबाव होता. जर त्यांनी भाजपशी जुळवून घेतले असते, तर कार्यकर्त्यांच्या नजरेत ते 'व्हिलन' ठरले असते. राजकारणात 'वेळ' महत्त्वाची असते आणि शिरसाटांनी वाऱ्याची दिशा ओळखली.
व्हिलन होता होता वाचले
राजकीय विश्लेषकांच्या मते, संजय शिरसाट यांना हे स्पष्ट उमजले होते की, जंजाळ यांनी 'कार्यकर्ता कार्ड' खेळून मास्टरस्ट्रोक मारला आहे. शिवसेनेला कमी जागांवर लढायला लावणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणे होते. आपल्या प्रतिमेला तडा जाऊ नये आणि शिवसैनिकांचा रोष ओढवू नये, यासाठी शिरसाटांनी अखेर म्यान केलेली तलवार बाहेर काढली आणि भाजपसोबत काडीमोड घेण्याचा निर्णय जाहीर केला.
बाजीगर ठरले जंजाळ!
या संपूर्ण नाट्यात खऱ्या अर्थाने बाजी मारली ती राजेंद्र जंजाळ यांनी. एका भावनिक आवाहनाद्वारे त्यांनी केवळ पक्षनेतृत्वालाच नव्हे, तर महायुतीलाही विचार करायला भाग पाडले. संघटना, निष्ठा आणि कार्यकर्ता या त्रिसूत्रीच्या जोरावर जंजाळ यांनी शिवसेनेतील आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.
आता पुढे काय?
युती तुटल्याने आता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे मैदान 'मल्टीपोलर' झाले आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट), उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एमआयएम यांच्यातील हा चौरंगी सामना आता कोणाच्या पथ्यावर पडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications