साकोलीचे भाऊ नानाभाऊ; नाना पटोले यांनी मिळवला निसटता विजय, पहा काय होती स्थिती...
Sakoli Assembly Constituency Result 2024- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उमेदवारीमुळे प्रतिष्ठेच्या ठरलेल्या साकोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच बाजी मारली. त्यांनी महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचा 208 मताधिक्याने पराभव केला.

ओबीसीचे नेते अशी ओळख
नाना पटोले हे शेतकरी, ओबीसी आणि वंचितांचे नेते म्हणून ओळखले जातात. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या नाना पटोले यांनी भंडारा जिल्हा परिषदेचे राजकारणातून राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. 1990 साली ते जिल्हा परिषद सदस्य होते. 1998- 99 मध्ये साकोली विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले. 2004 साली आमदार म्हणून पुन्हा त्यांची निवड झाली. 2008 साली पटोले यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि ते भारतीय जनता पक्षात दाखल झाले. 2014 साली भारतीय जनता पक्षाचे तिकिटावर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून ते खासदार झाले. मात्र मोदी सरकारच्या शेतकरी धोरणावर टीका करीत त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि ते पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले. 2018 साली किसान काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांना निवडण्यात आले.
काँग्रेसमध्ये आहे महत्त्वपूर्ण स्थान
2019 साली साकोली विधानसभा मतदारसंघातून ते पुन्हा एकदा निवडून आले. 2019 साली महाराष्ट्र विधानसभेचे चित्र संपूर्णपणे पालटले. उद्धव ठाकरे यांनी आयत्यावेळी युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादीशी घरोबा केला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. उद्धव यांच्या मंत्रिमंडळात मंत्री पदाची संधी मिळेल अशी नाना पटोले यांना आशा होती. पण नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष पद देण्यात आले. विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी केली. पण संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करून त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन टाकला. त्यांच्या या कृतीचा सर्वच मित्र पक्षांनी निषेध केला. नाना पटोले यांचा राजीनामा ही महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना ठरली. कारण विधानसभा अध्यक्ष पद नाना पटोले यांच्या राजीनामामुळे रिक्त झाले आणि या पदासाठी पुन्हा निवडणूक घेण्याची हिंमत महाविकास आघाडी सरकारने दाखवली नाही. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हेच अध्यक्ष पदाचा भार वाहत होते. घटनात्मक पेज प्रसंग लक्षात घेऊन एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाने त्याचा फायदा उठवला. उद्धव ठाकरे यांचे सरकार गडगडले त्यालाही नाना पटोले यांचा राजीनामाच कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते.
मिळवला निसटता विजय
विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांनी उठावदार कामगिरी केली. त्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळविले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस उदयास आली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची अवघी एक जागा निवडून आली होती तर 2024 च्या निवडणुकीत तब्बल 13 जागा निवडून आल्या. संघटनेत काम करत असतानाच नाना पटोले यांनी विधिमंडळातही सरकारवर आणि सरकारच्या धोरणावर जबरदस्त टीका प्रहार केले. त्यामुळे साकोली विधानसभा मतदारसंघात नाना पटोले यांना घेरण्याची पूर्ण तयारी महायुतीने केली होती. मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी निसटता विजय मिळवला.












Click it and Unblock the Notifications