राष्ट्रवादीसोबत युतीचा भाजपला लोकसभा निवडणुकीत फटका! संघाच्या मुखपत्राची टीप्पणी
मुंबई - शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष असल्याने भाजपने त्याच्याशी युती करणे नैसर्गिक आहे. पण मतदारांना भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेली युती पटली नाही, म्हणूनच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची अशी स्थिती झाली आणि त्यांना जबर फटका बसला, असे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या विवेक साप्ताहिकातील एका लेखात म्हटले आहे.
भाजपचे नुकसान
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असणाऱ्या विवेक साप्ताहिकात १५ जुलैला एक लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखात इतर मुद्द्यांसह लोकसभेतील भाजपच्या पराभवाचे विश्लेषणही आहे. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबतची युती मतदारांना पटली नाही, त्यामुळेच भाजपचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रवादीशी युतीमुळे नाराजी
विवेक साप्हाहिकातील एका लेखात राष्ट्रवादी-भाजप युतीवर भाष्य केले आहे. लोकसभेतील अपयशाची कारणे सांगताना वा आपापली नाराजी, अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीपासून. राष्ट्रवादीला सोबत घेणे भाजपाच्या कार्यकर्त्याला आवडलेले नाही हे स्पष्ट आहे, असे यात म्हटले आहे.
भाजप नेत्याला जाण
राष्ट्रवादीसोबतची युती मतदारांना पटली नाही याची जाणीव भाजप नेत्यांना नाही असे नाही. अलीकडेच स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीही एका मुलाखतीत याबाबत भाष्य केले होतेच. शिवसेनेने पुन्हा युतीत येणे, त्यासाठी शिवसेनेत घडलेले अंतर्गत बंड, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी आदी घटना कार्यकर्त्यांनी स्वीकारल्या असेही या लेखात नमूद आहे.
शिवसेनेशी युती नैसर्गिक
मतदारांचा कल जाणून घेत या लेखात भाष्य केले आहे की, हिंदुत्व हा सामायिक दुवा असल्याने आणि या युतीला मागील अनेक दशकांचा इतिहास असल्याने बारीकसारीक कुरबुरी असल्या तरी ही युती नैसर्गिक असल्याचे मतदारांना पटले होते. मात्र हीच भावना राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर अगदी दुसर्या टोकाला जाऊ लागली आणि लोकसभेमुळे या नाराजीत आणखी भर पडल्याचे चित्र आहे असेही या लेखात नमूद आहे.
काही राजकीय आडाखे असतात
राजकीय नेत्यांची वा पक्षाची स्वतःची अशी काही गणिते व आडाखे असतात. निवडणुकीच्या राजकारणाचे आकलन वेगळे असते; परंतु जर ही गणिते चुकताना दिसत असतील तर त्याचे काय करायचे, हा प्रश्न उपस्थित होतोच. तसेच, कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेमागे राष्ट्रवादीचा समावेश हे वरकरणी मुख्य कारण दिसत असले तरी तेवढेच एक मुख्य कारण आहे असे मुळीच नाही. ते केवळ हिमनगाचे टोक आहे, असे या मुखपत्राने म्हटले आहे.
आणीबाणीचे नॅरेटिव्ह पचणी पडेल का?
या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने आणीबाणीविरोधी संघर्ष आणि राम मंदिर आंदोलनात दिलेल्या योगदानाचे 'नॅरेटीव्ह' तरुण मतदारांच्या पचनी पडेल का, असा सवालही या लेखात उपस्थित करण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications