राम मंदिराला लागलेल्या कथित गळतीवरून रोहित पवार यांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका
मुंबई : अयोध्येचे राम मंदिर हे कोट्यावधी भारतीयांचे श्रद्धास्थान.500 वर्षांच्या संघर्षानंतर रामलल्ला आपल्या हक्काच्या जागेत विराजमान झाले. न्यायालयाच्या आदेशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर इमारतीचे भूमिपूजन केले आणि त्यांच्याच हस्ते रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.त्यानंतर राजकारण रंगले.

आता मंदिराला लागलेल्या कथित गळतीवरून मोदींवर टीकेची झोड उठवली जातेय.शरद पवारांची राष्ट्रवादी त्यात आघाडीवर आहे. शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहीत पवार यांनी आपल्या एक्स सोशल मिडीयावर एक ट्टिट करुन टीका केली आहे.
रोहीत पवार आपल्या पोस्ट म्हणतात...
"कोट्यवधी लोकांच्या श्रद्धास्थानाऐवजी सगळा फोकस स्वतःवर घेणं असो की, लोकांची भावना व श्रद्धा राजकीय बाजारात खरेदी करण्याचा प्रयत्न असो, हे जनता जनार्दनालाही पटत नसल्याचं लोकसभा निवडणुकीत अयोध्येतील भाजपच्या पराभवाने सिद्ध झालं.
अयोध्येतील मंदिराचं बांधकाम अर्धवट असूनही केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने घाईघाईत केलेली प्राणप्रतिष्ठा. आणि आता मंदिराचं गळत असलेलं छत बघितलं तर हा एक संदेशच आहे आणि तो लोकांना समाजतो तसा भाजपलाही कळेल, ही अपेक्षा! जात आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असल्याने यावर राजकीय पोळी भाजण्यापेक्षा सरकारने मुद्द्यांवर बोलावं.. लोकांच्या हाताला काम आणि पोटाला भाकरी हे विषय अधिक महत्त्वाचे आहेत. ही बाब सर्वक्षीय नेत्यांनी लक्षात घ्यावी", अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
प्रभू श्रीरामांविषयी प्रत्येक भारतीयाच्या मनात एक श्रध्दा आहे. परंतु या श्रध्देचा स्वतःच्या स्वार्थासाठी बाजार मांडण्याचं काम मोदीजींनी केलं. अपूर्णावस्थेतील राम मंदिराच्या उद्घाटनाची घाई केली नसती तर,आज पहिल्याच पावसात राम मंदिरात पाण्याची गळती झाली नसती, असा आरोप रोहीत पवार यांनी केला आहे.
भाजप सरकारच्या काळात करण्यात आलेल्या विविध कामांच्या दर्जावर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात अटल सेतूला पडलेल्या कथित भेगांचे प्रकरण कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी लावून धरले. त्यानंतर अयोध्या रेल्वे स्थानकाची खचलेली भिंत दाखवण्यात आली आणि आता राम मंदिराच्या गळतीला लक्ष्य करण्यात आलं आहे.
पावसाचे पाणी पहिल्या मजल्यावरून येत आहे आणि ते अपेक्षितच आहे. गुरु मंडप हा आकाशाच्या तसेच दुसर्या मजल्याच्या दिशेने खुला आहे आणि शिखर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पाणी आत येणार नाही. गळतीवरून करण्यात येत असलेले आरोप निखालस खोटे आणि निराधार असल्याचा दावा मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष सत्येंद्र दास यांनी केला आहे.
दरम्यान मंदिरातील या कथित गळती प्रकारावरून सोशल मिडीयावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्यायत. या प्रकरणावरून नरेंद्र मोदी यांना विरोधकांनी घेरले असून राष्ट्रवादी पक्षाने या फंदात पडू नये, अशी तंबी मोदी समर्थकांकडून देण्यात येत आहे.












Click it and Unblock the Notifications