रोहित पवारांचा दिल्लीत एल्गार! "अजितदादांच्या मृत्यूमागे मोठे षडयंत्र; मोदी-शाहांकडून न्याय मिळावा?
Rohit Pawar PC on Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील धक्कादायक निधनानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा तपास आणि त्यातील तांत्रिक त्रुटींवर बोट ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज देशाची राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
"अजितदादांना केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहच न्याय देऊ शकतात," असे म्हणत त्यांनी या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यावसायिक आणि राजकीय कटकारस्थान असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

'VSR' कंपनीला बड्या नेत्यांचे कवच?
रोहित पवार यांनी एका सखोल सादरीकरणाद्वारे काही धक्कादायक खुलासे केले. ते म्हणाले की, "मुंबईतील सादरीकरणानंतर आम्ही जेव्हा अधिक सखोल अभ्यास केला, तेव्हा 'व्हीएसआर' या विमान कंपनीचे धागेदोरे अत्यंत प्रभावशाली लोकांपर्यंत जात असल्याचे दिसून आले.
या कंपनीच्या पाठीशी सत्तेतील मोठे नेते आणि बडे उद्योगपती उभे आहेत. ज्यांनी या कंपनीला कर्ज दिले आहे, त्यांचे संबंध थेट तेलगू देसम पक्षाशी (TDP) आहेत. त्यामुळेच या कंपनीला वाचवण्याचा आणि मूळ तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला जात आहे."
नागरी उड्डाण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
रोहित पवारांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. "अपघातानंतर लगेचच मंत्र्यांनी 'लिअर जेट'ला क्लीन चिट देणारे विधान का केले? सूत्रांच्या हवाल्याने व्हीएसआर कंपनीचा याच्याशी संबंध नसल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत. डीजीसीए (DGCA) चे वरिष्ठ अधिकारीही यात सामील असण्याची शक्यता आहे," असा खळबळजनक आरोप पवारांनी केला. त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही या विषयात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
"पंतप्रधान आणि गृहमंत्रीच न्याय देऊ शकतात"
रोहित पवारांनी या प्रकरणाचे गांभीर्य सांगताना म्हटले की, "यात गुंतलेले लोक इतके शक्तिशाली आहेत की, त्यांचा सामना करण्यासाठी देशातील सर्वोच्च नेतृत्वानेच लक्ष घालणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः या तपासाची सूत्रे हाती घेऊन अजितदादांना न्याय मिळवून द्यावा. हा अपघात नसून एक व्यावसायिक किंवा राजकीय कट असू शकतो."
ट्रोलर्स आणि डेटा लीकवर पवारांचा प्रहार
या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी भाजपच्या आयटी सेलवर आणि ट्रोलर्सवर जोरदार टीका केली. त्यांनी उपस्थित केलेले काही महत्त्वाचे प्रश्न:
डेटा प्रायव्हसीचा प्रश्न
"मी कोणत्या फ्लाईटने दिल्लीला आलो, माझ्यासोबत कोणता सेलिब्रिटी होता, ही माहिती ट्रोलर्सकडे कशी जाते? आमच्या आधार कार्डची माहिती लीक कोण करत आहे?"
प्रशासनाची भूमिका
"आम्ही आरटीआय (RTI) टाकून माहिती मागितली तर मिळत नाही, पण भाजपच्या ट्रोलर्सना विमानतळ प्रशासन सर्व माहिती पुरवत आहे. ही माहिती दाबण्याचा किंवा आम्हास घाबरवण्याचा प्रयत्न आहे का?"
तपासाला विरोध का? "जेव्हापासून आम्ही या अपघातावर तांत्रिक पुरावे सादर करायला सुरुवात केली आहे, तेव्हापासून भाजपचे लोक इतके आक्रमक का झाले आहेत?"












Click it and Unblock the Notifications