लाडक्या बहिणींच्या पैशाला सरकार कात्री लावणार का..? रोहित पवारांच्या 'त्या' ट्विटने वाढली धाकधूक
लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात असतानाच काही महिलांच्या पैशाला कात्री लागणार असल्याचं बोललं जात आहे. या बातमीमुळे एकच चर्चा सुरु झाली आहे. काही महिलांच्या पैशाला कात्री लावण्याचा सरकार विचार करत आहे, असा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत रोहित पवारांचं ट्विट चर्चेत आलं आहे.

काय आहे सरकारचा विचार?
ज्या महिलांना शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळतो, त्या शेतकरी महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ देताना कृषी सन्मान योजनेचे पैसे वजा करण्याचा विचार सरकार करत आहे, असा दावा विरोधी पक्षातील काही नेत्यांनी केला आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणींच्या पैशांना कात्री लागण्याची शक्यता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत व्यक्त केली आहे. त्यांनी यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थी महिला शेतकऱ्यांना लाडकी बहिण योजनेचा लाभ देताना कृषी सन्मान योजनेचे पैसे वजा करण्याचा विचार सरकार करत असेल तर सरकारने अक्कल गहाण ठेवलीय का? असा प्रश्न पडतो.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 4, 2025
मुळात शेतकरी महासन्मान योजना, लाडकी बहिण योजना आणि या दोन्ही योजनांचे उद्देश पूर्णता… pic.twitter.com/fQ81dGnOMg
काय म्हणतात रोहित पवार?
शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थी महिला शेतकऱ्यांना लाडकी बहिण योजनेचा लाभ देताना कृषी सन्मान योजनेचे पैसे वजा करण्याचा विचार सरकार करत असेल, तर सरकारने अक्कल गहाण ठेवलीय का? असा प्रश्न पडतो. मुळात शेतकरी महासन्मान योजना, लाडकी बहिण योजना आणि या दोन्ही योजनांचे उद्देश पूर्णता भिन्न आहेत. हे सरकारने लक्षात घ्यावे. उगाच अकलेचे तारे तोडून पळ काढण्याचा प्रयत्न करू नये. सरकार असा निर्णय घेणार असेल तर हा निर्णय मागे घेण्यास आम्ही सरकारला भाग पाडू, हे सरकारने विसरू नये!' असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.
अदिती तटकरेंचे अगोदरचे वक्तव्य
मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबाबत महिलाच्या मनातील भिती यापूर्वीच काढली होती. ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या वर असेल, ज्या महिलांच्या मालकीची चारचाकी गाडी असेल, ज्या महिलांचं नाव बँकेमध्ये वेगळं आणि आधार कार्डवर वेगळं असेल, ज्या महिलांनी या योजनेंतर्गत दोन अर्ज भरले असतील, अशाच महिलांची तक्रार आल्यास त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी करण्यात येईल, असं तटकरे यांनी म्हटलं दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं. आता विरोधकांच्या आरोपांना सत्ताधारी काय उत्तर देतात, हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications