'उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष कोण हेही ठरलं असेल': रोहित पवारांच्या दाव्यावर भुजबळांचा खोचक टोला
Chhagan Bhujbal reaction on Rohit Pawar NCP statement : राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) अंतर्गत घडामोडी आणि विलीनीकरणाच्या चर्चांवरून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वाकयुद्ध रंगलं आहे. आमदार रोहित पवार यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यांची ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत खिल्ली उडवली आहे. "विलीनीकरण झालं नाही, त्याआधीच पदं वाटून झाली असतील तर आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष कोण, हेही ठरलं असेल कदाचित, असा उपरोधिक टोला भुजबळांनी लगावला आहे.

रोहित पवारांचा दावा काय होता?
आमदार रोहित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत खळबळ उडवून देणारा खुलासा केला होता. त्यांच्या दाव्यानुसार दिवंगत नेते अजित पवार यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणून संघटनेत मोठे फेरबदल करायचे होते. प्रदेशाध्यक्षपदी एक तरुण चेहरा असावा, असं अजितदादांना वाटत होतं. त्यासाठी खासदार अमोल कोल्हे यांच्या नावाची चर्चा झाली होती. या संदर्भात जयंत पाटील यांच्या निवासस्थानाजवळ सुमारे १३ बैठका झाल्या होत्या, ज्याचे पुरावे सीसीटीव्ही चित्रफितीत सापडू शकतात, असा दावाही त्यांनी केला.
छगन भुजबळ यांचे प्रत्युत्तर: "आम्हाला काहीच माहीत नाही"
रोहित पवारांच्या या विधानांवर बोलताना छगन भुजबळ यांनी उपरोधाचा आधार घेतला. "रोहित पवार सांगत आहेत की अजितदादांनी त्यांच्यासोबत काही ठरवलं होतं, मात्र आम्हाला तसं काहीही सांगितलेलं नव्हतं. अशा प्रकारचे कोणतेही निर्णय आमच्या माहितीमध्ये नव्हते," असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
पदवाटपावरून खिल्ली
विलीनीकरण होण्यापूर्वीच पदं ठरल्याच्या दाव्यावर भुजबळ म्हणाले की, अजून विलीनीकरण झालेलं नाही आणि त्याआधीच कोण कोणत्या पदावर बसणार हे ठरवून टाकलं गेलं असेल, तर त्यावर काय बोलायचं? मग कदाचित पुढचा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष कोण, हेही ठरलं असेल!"
सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब
सध्याच्या पक्षीय स्थितीवर भाष्य करताना भुजबळ यांनी स्पष्ट केले की, "सध्या पक्षाचे नेतृत्व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हातात आहे. त्यांना पूर्ण सहकार्य करणे हे आमचे कर्तव्य आहे. नवीन नेतृत्व काय निर्णय घेते, त्यानुसार पुढील भूमिका ठरेल."
वादाचे केंद्रबिंदू : १३ बैठका आणि सीसीटीव्ही
रोहित पवार यांनी या वादात 'भावनिक' पदर जोडताना सांगितले की, अजितदादांना कुटुंब आणि पक्ष पुन्हा एकत्र यावा असं मनापासून वाटत होतं. मात्र, छगन भुजबळ यांनी या दाव्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत, पक्षात अधिकृतपणे काहीही ठरलेले नसताना अशा वावड्या उठवल्या जात असल्याचा आरोप केला आहे.












Click it and Unblock the Notifications