अजित पवार विमान अपघात; PM सुरू असतानाच कंपनीला क्लीन चिट देण्याचा डाव; कोणी केला गंभीर आरोप!
Rohit Pawar on Ajit Pawar plane crash : महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताने संपूर्ण राज्य हादरले असतानाच, आता या प्रकरणाला भीषण राजकीय वळण लागले आहे. "बारामतीत अजित दादांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन सुरू असतानाच, दिल्लीत 'व्हीएसआर' (VSR) कंपनीला वाचवण्यासाठी हालचाली सुरू होत्या," असा खळबळजनक आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या आरोपांमुळे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय आणि डीजीसीए (DGCA) आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

'विमानाच्या ऑडिटमध्ये क्लीन चिट देण्याचा घाईघाईत प्रयत्न'
बुधवारी विधानभवनाच्या प्रांगणात प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी कागदपत्रांचा दाखला देत गंभीर प्रश्न उपस्थित केले. २८ जानेवारीला ज्या दिवशी हा अपघात झाला, त्याच दिवशी दुपारी १:३६ वाजता DGCA ने पहिला अहवाल प्रसिद्ध केला. रोहित पवारांच्या मते, हा अहवाल अशा वेळी आला जेव्हा नेत्याचे शवविच्छेदन सुरू होते.
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या ऑडिटमध्ये व्हीएसआर कंपनीच्या विमानात कोणत्याही 'लेव्हल-१' च्या त्रुटी नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले होते. हा प्रकार म्हणजे एका खासगी कंपनीला वाचवण्याचा पूर्वनियोजित प्रयत्न होता, असे पवार म्हणाले.
केंद्रीय मंत्र्यांवर थेट निशाणा
रोहित पवार यांनी केवळ अधिकाऱ्यांवरच नाही तर थेट केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांच्यावरही तोफ डागली. मंत्र्यांनी अपघाताच्या दिवशीच विमानात सुरक्षेच्या कोणत्याही त्रुटी नसल्याचे विधान केले होते. वैमानिकालाही क्लीन चिट देण्यात आली होती. जेव्हा चौकशी सुरूच झाली नव्हती, तेव्हा एवढ्या आत्मविश्वासाने क्लीन चिट कशी दिली जाते?" असा रोखठोक सवाल त्यांनी विचारला.
DGCA चा नवा अहवाल: 'नखाएवढे यश'
नुकत्याच आलेल्या DGCA च्या नव्या ऑडिट अहवालात विमानात अनेक त्रुटी असल्याचे समोर आले आहे. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, स्पेशल ऑडिटमध्ये एअर वर्दीनेस प्रमाणपत्र (Airworthiness), एअर सेफ्टी आणि फ्लाईट ऑपरेशन या सर्व स्तरांवर कंपनीचे वाभाडे निघाले आहेत.
हलगर्जीपणामुळे नेता गमावला
"तुमच्या भ्रष्टाचारामुळे आणि हलगर्जीपणामुळे महाराष्ट्राचा लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आणि मोठा नेता गेला," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीसांना विनंती आणि FIR चा पवित्रा
रोहित पवार यांनी या प्रकरणी आता कायदेशीर लढा पुकारण्याचे संकेत दिले आहेत. मुंबईत DGCA विरोधात गुन्हा दाखल करण्याची काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) ची तयारी आहे. जर मुंबईत गुन्हा दाखल झाला नाही, तर बारामतीला जाऊन पीआयच्या (PI) समोर ठाण मांडून बसू, असा इशारा त्यांनी दिला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयात तातडीने लक्ष घालावे आणि तपास यंत्रणांना निष्पक्ष चौकशीचे आदेश द्यावेत, अशी विनंती रोहित पवारांनी केली आहे.
"हा लढा केवळ माझा नाही"
महाराष्ट्रातील जनतेला आणि कार्यकर्त्यांना आवाहन करताना रोहित पवार म्हणाले की, हा मुद्दा केवळ एका पक्षाचा नसून राज्याच्या अस्मितेचा आणि सुरक्षेचा आहे. महाराष्ट्राच्या दबावामुळेच आता DGCA ला आपल्या अहवालात त्रुटी मान्य कराव्या लागल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications