रोहिणी खडसे यांचे महिला दिनानिमित्त राष्ट्रपतींना पत्र; म्हणाल्या- आम्हाला खून करण्याची परवानगी द्या
Rohini Khadse Letter to President Draupadi Murmu : आज जागतिक महिला दिन जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दुसरीकडे या दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले. त्यात त्यांनी थेट आम्हाला खू करण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली. नेमकी अशी मागणी त्यांनी का केली आहे, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. तर त्यांचे पत्र सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
रोहिणी खडसे यांनी पत्रात म्हटले आहे की, सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला देश हा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे अहिंसेचे मोठे प्रतीक आहे तरी आपली क्षमा मागून वरील मागणी करत आहे. त्याचे कारणही मात्र तसेच आहे.

महिलांवरील अत्याचारांत वाढ
देशात महिला मोठ्या प्रमाणात असुरक्षित आहेत. येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. दोनच दिवसांपूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे एका 12 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. राष्ट्रपती महोदया, 12 वर्षीय! विचार करा काय परिस्थिती असेल?, त्यामुळे आम्हाला अशा नराधमांना मारण्याची परवानगी द्या, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे.
मा. द्रौपदी मूर्मू
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) March 8, 2025
राष्ट्रपती, भारत @rashtrapatibhvn
विषय :- एक खुन माफ करणेबाबत
महोदया,
सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे अहिंसेचे मोठे प्रतीक आहे तरी आपली क्षमा… pic.twitter.com/bE8JMogdZ7
एक खून माफ करा
रोहिणी खडसे सदर पत्रात म्हणतात की, नुकताच वर्ल्ड पॉपुलेशन रिव्यू सर्व्हे आला आहे, अशा बातम्या आम्ही वाचल्या. या सर्व्हेमध्ये महिलांसाठी असुरक्षित असलेल्या जगातील विविध देशांचा उल्लेख केला आहे.
या सर्व्हेनुसार आशिया खंडात भारत सर्वात असुरक्षित देश असल्याचे म्हटले गेले आहे. महिलांचे अपहरण, महिला बेपत्ता होण्याचे प्रकार, घरगुती हिंसाचार आणि अन्य गंभीर विषयांचाही समावेश आहे. त्यामुळे आम्हाला एक खून माफ करा, अशी आम्ही समस्त महिलांच्या वतीने मागणी करत आहे.
हीच महिला दिनाची खरी भेट समजू
अत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा, निष्क्रिय असलेल्या कायदा सुव्यवस्थेचा आम्हाला खून करायचा आहे. महोदया, आपल्या राज्यावर, देशावर संकट आले म्हणून महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तलवार उपसली होती.
मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही का मागे राहावे. आमच्या मागणीचा यथोचित विचार करून आपण आमची मागणी मान्य कराल ही अपेक्षा करते. हीच तुमच्याकडून आम्हाला जागतिक महिला दिनाची भेट समजू, असे रोहिणी खडसे त्या पत्रात म्हणाल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications