बाळासाहेबांचे काँग्रेससोबत होते वैचारिक मतभेद; शिवसैनिकांचे जीव गेले, काँग्रेस-शिवसेनेचे नाते कसे?
Relationship between Congress and ShivSena : "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल चार चांगले शब्द" बोलण्याचे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिले. नरेंद्र मोदी यांनी राहुल यांना हाणलेला तो फक्त टोला नव्हता तर बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांच्यातील तात्विक तसेच वैचारिक मतभेदांना दिलेला तो उजाळा होता.
बाळासाहेब ठाकरे हे मराठी आणि हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे घेऊन पुढे जाणारे नेतृत्व होते. आक्रमकता हा त्यांचा स्थायीभाव होता त्यामुळेच महाराष्ट्रात काँग्रेसचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे प्रचंड खटके उडाले. हे खटके इतके टोकाचे होते की त्यात अनेकांचा बळी गेला, स्वतः बाळासाहेब ठाकरे यांना दोन वेळा अटक झाली आणि अनेक वेळा बाळासाहेबांचा पक्ष फुटण्यातही त्याची परिणती झाली. फक्त राहुल गांधी यांच्या आग्रहामुळे मुंबईतील शिवसैनिकांना बाक्या प्रसंगाला सामोरे जावे लागले होते, ही गोष्ट फार जुनी नाही.

कॉंग्रेस सरकारच्या गोळीबारात सिमासात्याग्रही ठार आणि बाळासाहेबांना अटक
१९६० च्या दशकाचा तो काळ सर्वार्थाने वेगळा होता. महाराष्ट्राची स्थापना झालेली असली तरी मोठा मराठी बहुल भाग अन्य राज्यात जुलमाने दाबण्यात आला होता. विशेषतः कर्नाटकात डांबण्यात आलेला मराठी भूभाग पुन्हा महाराष्ट्राला मिळावा, अशी मराठी भाषिकांची मागणी होती.. बाळासाहेब ठाकरे या मागणीचे पुरस्कर्ते होते. तत्कालीन उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या मुंबई दौऱ्यात बेळगाव सीमा प्रश्न संदर्भात त्यांना निवेदन देण्याचे शिवसेनेने ठरवले. हजारो शिवसैनिक गोळा झाले आणि त्यांनी मोरारजी देसाई यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. गाडी सुटायला निघाली त्यात काही शिवसैनिक चीरडले गेले आणि दंगल भडकली. पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यात 59 मराठी भाषिक मारले गेले. काँग्रेस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या दरम्यान उडालेला तो पहिला सर्वात मोठा खटका होता. या आंदोलनानंतर लगेचच बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी यांना अटक करण्यात आली आणि त्यांना तुरुंगात दाबण्यात आले. त्यानंतर मुंबई अनेक दिवस जळत होती. स्थिती हाताबाहेर जात होती. अखेरीस बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः शिवसैनिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आणि मुंबई शहर शांत झाले. मोरारजी देसाई यांच्या गाडी समोरचे आंदोलन असो किंवा बाळासाहेब ठाकरे यांची अटक या दोन्ही प्रकरणांच्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ते काँग्रेसचे वसंतराव नाईक.
कॉंग्रेसशी बाळासाहेबांचे वैचारिक मतभेद
त्यानंतर शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातले राजकीय संबंध कायम कटुतेचे राहिले. वैचारिक मतभेद हे त्याचे प्रमुख कारण होते. बाळासाहेबांची भूमिका उघड हिंदुत्ववादी होती तर काँग्रेस हा पुरोगामी विचारांचा पक्ष होता. ९० च्या दशकात रामजन्मभूमी आंदोलनाने पेट घेतला आणि शिवसेनेनेही त्याला पाठिंबा दिला. 1992 साली बाबरी मशीद पडली. "ही मशीद पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे" अशी जाहीर भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. तर दुसरीकडे हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी काँग्रेस, समाजवादी पक्ष, लालूप्रसाद यादव अशा पक्षानी कंबर कसली होती.
रचनेलाही विरोध
काँग्रेसची लांगुलचलनाची भूमिका बाळासाहेब ठाकरे यांना कधीच आवडली नाही. मतांसाठी कोणाचाही अनुनय करण्यास त्यांचा विरोध होता. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांची बाळासाहेब ठाकरे हेटाळणी करीत असत. "माझ्या संघटनेची जेव्हा कधी काँग्रेस होईल तेव्हा मी माझे दुकान बंद करून टाकीन," असे स्पष्ट विधान बाळासाहेब ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते. काँग्रेसच्या रचनेबद्दल आणि काँग्रेसचा विचारधारेबद्दल बाळासाहेबांना इतकी चिड होती.
शिवसेनेतील बंडखोरांना कॉंग्रेसचाच आसरा
बाळासाहेबांच्या हयातीत शिवसेना पक्षात अनेक वेळा बंड झाले. बाळासाहेबांच्या उमेदीच्या काळात आक्रमक नेते असलेले छगन भुजबळ यांनी शिवसेना पक्ष सोडला. त्यांच्यासोबत १८ आमदार फुटले. हे सगळे आमदार अन्य कोणत्याही पक्षात न जाता काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यावेळी काँग्रेसचे नेते होते शरद पवार. राष्ट्रवादीची स्थापना होईपर्यंत शिवसेनेतून फुटलेल्या सगळ्या नेत्यांना काँग्रेसनेच आसरा दिला. शिवसेनेतून फुटलेला कोणताही नेता भारतीय जनता पार्टी, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन विकास आघाडी, जनस्वराज्य शक्ती, बहुजन समाज पक्ष अशा महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या कोणत्याही पक्षात गेला नाही.शिवसेनेच्या इतिहासात भुजबळांच्या नंतर सर्वात गाजलेले बंड होते ते नारायण राणे यांचे. विरोधी पक्ष नेते असलेल्या नारायण राणे यांनी अकरा आमदारांसह काँग्रेसशी संधान साधले. त्यावेळी पक्ष वाचवताना बाळासाहेबांच्या हयातीतच उद्धव ठाकरे यांना घाम फुटला होता. कशीबशी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वाचवली. नारायण राणे यांच्या त्या बंडाला आश्रय दिला होता तो काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसच्या तत्कालीन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रभाव आणि तत्कालीन महाराष्ट्र प्रभारी मार्गारिट अलवा यांनी. राणे यांच्यासोबत गेलेले विजय वडेट्टीवार आज काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आहेत.
बाळासाहेबांना पुन्हा अटक
2000 साली बाळासाहेब ठाकरे यांना पुन्हा अटक झाली तेव्हाही मुंबई प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणारे गृहमंत्री होते छगन भुजबळ आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते ते विलासराव देशमुख.
माय नेम इज खान प्रकरणात १२०० शिवसैनिकांवर गुन्हे
2010 साली शाहरुख खानचा माय नेम इज खान नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्याला शिवसेनेने विरोध दर्शविला. मात्र काँग्रेसने या चित्रपटाचे प्रदर्शन फारच मनावर घेतले. मुंबई त्या चित्रपटाला चित्रपटगृह मिळू नये यासाठी शिवसेनेचा दबाव वाढत होता तर कोणत्याही परिस्थितीत चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी काँग्रेसने जोर लावला होता. यात आंदोलन करणारे बाराशे शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि खटलेही भरले गेले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे बाळासाहेब ठाकरे यांना दैवतासमान होते. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री मनी शंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल अनुद्गार काढले तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून मनी शंकर अय्यर यांच्या फोटोला जोडे मारले होते. ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणात खूप गाजली होती आणि बाळासाहेबांची विचारधारा स्पष्ट करणारी बाळासाहेबांची कृती सुद्धा होती.
विचारधारेला उद्धव यांची मुरड, कॉंग्रेस कायम
काँग्रेस आणि शिवसेना यांच्या तात्विक संघर्षाला असा जुना इतिहास आहे. 2019 नंतर सगळे चित्र पालटले. गेली 50 -55 वर्षे ज्या काँग्रेसशी वैचारिक संघर्ष केला, कार्यकर्त्यांनी मार खाल्ला, कित्येक जण इहलोकीची यात्रा संपवून गेले त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी सत्तेकरिता आघाडी करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांची ही आघाडी झाली. तिघांमध्ये किमान समान कार्यक्रम ठरला. उद्धव ठाकरे यांनी आपल्या विचारधारेला मुरड घातली पण काँग्रेसने मात्र आपली विचारधारा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या माथी मारणे सुरू ठेवले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर काँग्रेसच्या एका नेत्याने हीन शब्दात लेख लिहिला. त्यावरून महाराष्ट्रात गदारोळ निर्माण झाला. पण उद्धव ठाकरे यांनी एका शब्दानेही काँग्रेसच्या नेत्याचा निषेध केला नाही. सावरकरांवर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी खुद्द आदित्य ठाकरे नांदेडला गेले होते. सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यापैकी कोणत्याही नेत्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त किंवा त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना वंदन करणारे साधे ट्विटसुद्धा लिहिलेले नाही. बाळासाहेब ठाकरे कधीही स्वतःचे घर सोडून राजकीय तडजोडीसाठी कुणाच्याही घरी गेले नव्हते. मोठमोठे राष्ट्रीय नेते आणि आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी येत असत. नरेंद्र मोदी तसेच अमित शहा हे देखील मातोश्री या निवासस्थानी येऊन चर्चा करून गेले होते. मात्र उद्धव ठाकरे स्वतः कुटुंबासह सोनिया गांधी यांची भेट घेऊन आले होते. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यापैकी एकाही नेत्याने मातोश्रीचे दर्शन सुद्धा अद्याप घेतलेले नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेसशी जवळीक साधायचा प्रयत्न करीत असली तरी काँग्रेसने मात्र फक्त राजकारणापुरता त्यांचा उपयोग करून घेतल्याचे दिसते आहे. अन्य मित्र पक्षांप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जवळची जागा काँग्रेसच्या दरबारात अजूनही मिळालेली नाही.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications