शेतकरी नेते रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन; चौथ्या दिवशी रक्तदाब वाढला, प्रकृती खालावली
Ravikant Tupkar : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशी तुपकर यांचा रक्तदाब वाढला असून रक्तातील साखरेचं प्रमाणही कमी झाले आहे. दुसरीकडे राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी फोनवरुन संवाद साधत आंदोलन थांबवा, मुंबईत या, असे आवाहन केले. तुमच्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील, असा विश्वास देखील त्यांनी दिला. मात्र, तुपकर हे त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतली भेट
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी रविकांत तुपकर हे मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. आज रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री तुपकर यांची स्थानिक उपविभागीय अधिकारी यांनी भेट घेतली होती. तसचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनीही तुपकर यांच्याशी फोन वरून बातचीत केली होती. आंदोलन थांबवून मुंबईला या, आपण बैठकीत प्रश्न सोडवू असं आवाहन मुंडे यांनी केले. परंतु रविकांत तुपकर हे त्यांच्या मागण्यावर ठाम आहेत.

चौथ्या दिवशी प्रकृती खालावली
दरम्यान चार दिवस अन्नाचा कणही न घेतलेल्या तुपकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचा रक्तदाब वाढल्यानं रक्तातील साखरेचं प्रमाण लक्षणीय कमी झालं आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. आपल्या जीवाला काहीही झाले तरी पर्वा नाही. परंतु, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे, अशी भूमिका तुपकर यांनी मांडली.
सोयाबीन आणि कापसाला योग्य दराची मागणी
महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. परंतू, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य भाव मिळत नाही. उत्पादन खर्चही निघत नाही आणि कापूस व सोयाबीनला उत्पादन खर्चाचा अर्धा भाव देखील मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याच कारणासाठी सोयाबीन आणि कापसाला योग्य दर मिळवण्यासाठी रविकांत तुपकर यांचे आंदोलन सुरु आहे.












Click it and Unblock the Notifications