रतन टाटांनी 26/11 हल्ल्यानंतर त्यांचा जेव्हा कुणीच उचलला नव्हता काॅल! ' पुन्हा उभारलं ‘ताज' हाॅटेल
Ratan Tata : प्रसिद्ध उद्योगपती, सामाजिक दातृत्व आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं. रतन टाटा यांच्या निधनाचं वृत्त समजताच देशभरात शोककळा पसरली. बुधवारी सायंकाळी उशिरा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. 26 नोव्हेंबर 2008. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची ती काळरात्र कशी होती हे रतन टाटा यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.
टाटांनी सांगितलं होतं ती काळरात्र कशी...
देशावर 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. हा हल्ला मुंबईवर झाला. समुद्री मार्गे दहशतवादी आले होते. त्यावेळी झालेला हल्लाचा थरारक आठवणी आहेत. त्या अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. दहशतवाद्यांनी प्रसिद्ध ताज हाॅटेलला लक्ष्य केलं होतं. या हल्ल्याची ती काळरात्र कशी होती हे रतन टाटा यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

टाटांचा कुणीच फोन उचलला नव्हता
रतन टाटा सांगतात, "त्या रात्री माझ्या एका सहकाऱ्याचा फोन खणखणला. 'ताज' मध्ये प्रचंड गोळीबार सुरू झाला आहे, असं मला त्या सहकाऱ्याने सांगितलं. मी लगेच 'ताज' हाॅटेलच्या स्विच बोर्डला फोन केला. पण कोणीही माझा फोन उचलला नाही...मी तातडीने 'ताज' हाॅटेलच्या लाॅबीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला पण तेही शक्य झालं नाही. हाॅटेलमध्ये पोलीस पोहोचले होते.पोलिसांनी सगळ्यांना बाहेर काढलं. मी काही वेळ तिथे बाहेर थांबलो... काही वेळाने घरी आलो. आमच्या हाॅटेलमध्ये काय चाललं आहे हे मी टीव्हीवरच पाहू शकत होतो. हा दहशतवादी हल्ला आहे हे पहिल्या काही तासांतच स्पष्ट झालं होतं."
हे ही वाचा : Ratan Tata :रतन टाटांच्या या आहेत 10 मोठ्या गोष्टी! त्यांनी देशासाठी जे केलं ते कुणालाही जमणार नाही?
'संकट तर मोठं आहे पण आपण यातूनही उभे राहू'
रतन टाटा आपल्या मुलाखतीत पुढं असं म्हटले होते की, "दुसऱ्या दिवशी सकाळी सरकारी कार्यालयातून मला फोन आला. हा हल्ला आम्ही परतवून लावला आहे, असं त्यांचं सांगणं होतं. पण हे संकट संपलं नव्हतं. पुढचे तीन दिवस हा हल्ला सुरू राहिला. आपल्या देशाच्या शत्रूने आपल्यावर हल्ला केला होता हे आता सगळ्यांनाच कळून चुकलं होतं. या हल्ल्यानंतर माझं उत्तर होतं... 'हो. संकट तर मोठं आहे पण आपण यातूनही उभे राहू. 'ताज' हाॅटेल पुन्हा उभं करू!"
हे ही वाचा : रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात 1 दिवस दुखवटा, सरकारने 'हा' दिला मान! CM शिंदेंनी केली ही घोषणा
"मुंबई कधीच कुणापुढे झुकत नाही. हे शहर पुन्हा उभं राहतं. सगळे मुंबईकर या हल्ल्यामध्ये खंबीर राहिले. या शहराचा, शहरवासियांचा म्हणूनच प्रत्येकाला अभिमान आहे. या दहशतवादी हल्ल्याला घाबरून कुणीही पळ काढला नाही. सगळ्यांनीच जे करता येणं शक्य होतं ते केलं."
दहशतवाद्यांना रतन टाटांनी कृतीतून दिलं खणखणीत उत्तर
रतन टाटांनी या दहशतवादी हल्ल्यातून 'ताज' हाॅटेल पुन्हा उभं केलं आणि मुंबई आणि ताज त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे हा विश्वास जगभरातल्या पर्यटकांना दिला. 'ताज'वरच्या हल्ल्यानंतर तिथे जाऊन परिस्थितीची पाहणी करणारे रतन टाटा आजही सगळ्यांच्या स्मरणात आहेत.
हे ही वाचा : रतन टाटा यांचे कोणत्या आजाराने आजाराने निधन झाले? अंत्यसंस्कार कधी? एका क्लिकवर सर्व माहिती वाचा
हल्ल्यामुळे उद्धवस्त झालेलं 'ताज' पाहून ते जराही मागे हटले नाहीत. त्यांनी सर्वांना या कटू आठवणी विसरून जाण्याची उमेद दिली आणि मुंबईत गेट वे ऑफ इंडियाच्या समोर ताज हाॅटेल पुन्हा दिमाखात झळकलं ते आजही. काहीही झालं तरी संकटावर मात करून पुन्हा उभं राहता येतं हे रतन टाटांनी आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिलं आहे. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला रतन टाटांनी दिलेलं हे खणखणीत उत्तर होतं. आज त्यांचं जाणं सर्वांनाच चटका लावणारं आहे.












Click it and Unblock the Notifications