"मी खरा वाघ, ठाकरे बंधू केवळ कागदी!"; भाजप नेत्याने डागली तोफ, उद्धव ठाकरेंची काढली लाज!
BJP vs Thackeray alliance : "मी ठाकरे बंधूंसारखा कागदी वाघ नाही, मी खरा वाघ आहे," अशा शब्दांत दानवे यांनी राज ठाकरेंच्या 'दानव' या टोल्याला प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ऐतिहासिक युतीनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी दोन्ही बंधूंवर बोचरी टीका केली आहे.

युतीचा आनंद, पण भविष्याची धास्ती
बुधवारी राज आणि उद्धव ठाकरे यांनी हॉटेलमध्ये एकत्र येत युतीची घोषणा केली. यावर बोलताना दानवे म्हणाले, "ठाकरे बंधू एकत्र आले याचा आम्हाला आनंदच आहे. मात्र, आता दोघांनी पुन्हा विभक्त होण्याची पाळी येऊ नये, इतकेच मला वाटते."
२०१४ आणि २०१९ च्या राजकारणाचा दाखला देत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या 'अनैसर्गिक युती'वर निशाणा साधला. महाविकास आघाडीचे सरकार जनतेला आवडले नाही, म्हणूनच त्यांचे शिलेदार त्यांना सोडून गेल्याचा दावा त्यांनी केला.
"शेपटी खाली घालून विधान परिषदेवर गेलो नाही"
उद्धव ठाकरे यांनी दानवेंना पक्षात कोणी विचारत नसल्याची टीका केली होती. त्याला उत्तर देताना दानवे चांगलेच आक्रमक झाले. "भाजपने मला सभापती, आमदार, खासदार, दोनदा केंद्रात मंत्री आणि राज्याध्यक्ष केले. जर विचारले नसते, तर हे शक्य झाले असते का? माझा मुलगा आज तिसऱ्यांदा आमदार झाला आहे."
उद्धव ठाकरेंवर थेट हल्ला चढवत दानवे म्हणाले, "मी उद्धव ठाकरेंसारखा काळा बुरखा घालून किंवा शेपटी खाली घालून चोरट्या मार्गाने विधान परिषदेवर गेलो नाही. मी जनतेच्या दरबारातून डरकाळ्या फोडत विधानसभा आणि लोकसभेत निवडून गेलो आहे."
'देव' आणि 'दानव' वादाचा अंक
या वादाची ठिणगी बुधवारी पडली होती. जेव्हा पत्रकारांनी रावसाहेब दानवेंच्या टीकेबद्दल राज ठाकरेंना विचारले, तेव्हा राज यांनी "उत्तरे देवाला द्यायची असतात, दानवांना नाही" असे म्हणत दानवेंच्या आडनावावरून टोला लगावला होता. यावर दानवे म्हणाले की, हे 'कागदी वाघ' फक्त बोलण्यात हुशार आहेत, प्रत्यक्षात त्यांचे अस्तित्व संपत चालले आहे.
"ठाकरेंचे पक्ष अस्तित्वात राहणार नाहीत"
रावसाहेब दानवे यांनी भविष्यातील राजकीय चित्रावर एक मोठा दावा केला. ते म्हणाले की, या निवडणुकीनंतर ठाकरेंचे पक्ष अस्तित्वातही राहणार नाहीत. प्रचारादरम्यान जनतेचा कल मला स्पष्ट समजला आहे. जर हे निवडणुकीत पराभूत झाले, तर कार्यकर्त्यांना त्यांच्यासोबत राहण्यात काहीच भविष्य दिसणार नाही. त्यामुळे उर्वरित कार्यकर्तेही त्यांना सोडून जातील," असे भाकीत त्यांनी वर्तवले.












Click it and Unblock the Notifications