मोठी बातमी : रावसाहेब दानवे-बबनराव लोणीकर यांचा 12 वर्षांचा अबोला संपला! काय घडलं नेमकं?
Raosaheb Danve and Babanrao Lonikar : जालना जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे दोन दिग्गज नेते, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर, यांनी तब्बल १२ वर्षांचा राजकीय अबोला संपुष्टात आणला आहे.
हे दोन्ही नेते गेली ४० वर्षे एकाच पक्षात कार्यरत असूनही त्यांच्यातील वाद जिल्ह्यासाठी चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने 'कार्यकर्त्यांसाठी' आम्ही एकत्र आलो आहोत, अशी घोषणा करत त्यांनी आपला मतभेद संपवल्याचे दाखवून दिले आहे.

कार्यकर्त्यांसाठी झालेला वाद, कार्यकर्त्यांसाठीच मिटवला!
रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर यांच्यातील वादाचा मूळ मुद्दा वैयक्तिक नसून तो कार्यकर्त्यांच्या पदांसाठी होता, असे दोघांनीही स्पष्ट केले आहे. "भारतीय जनता पार्टी आम्ही उभी केली, तिला यश मिळवून दिले. आता आम्ही एकत्र आलो, यात काही नवल वाटत नाही. आमचा वाद हा कार्यकत्यांच्या पदासाठी होता, त्यामध्ये वैयक्तिक वाद नव्हता. तो वाद आता आम्ही संपवला आहे. या वादाचा फायदा विरोधकांना होत होता, आता मात्र दोघे मिळून कार्यकर्त्यांना संधी देणार आहोत."
दानवे यांनी सांगितले की, कोणत्या पदाधिकाऱ्याला संधी द्यायची याचा निर्णय आता आम्ही दोघे मिळून घेणार आहोत. कार्यकर्त्यांसाठी सुरू झालेला हा वाद आता कार्यकर्त्यांसाठीच मिटवला आहे.
आमच्या एकत्र येण्याने आता विरोधकांना त्रास होणार आहे. ही आमच्या विचारांची लढाई आहे आणि ज्याला जुळायचं आहे ते जुळणारच, असेही दानवे म्हणाले.
लोणीकर म्हणाले: "आम्ही मनाने एकत्रच होतो"
माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी त्यांच्यातील संबंधांबद्दल भावनिक मत व्यक्त केले. "आमचा पक्ष जिल्ह्यामध्ये एक नंबरवर कायम राहावा यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत," असे लोणीकर म्हणाले. लोणीकर यांनी, "आम्ही मनाने एकत्रच होतो," असे नमूद करत त्यांच्यातील कटुता संपल्याचे संकेत दिले.
भाजपला नंबर एकवर ठेवण्याचे आवाहन!
जालना जिल्ह्यात भाजपची स्थिती मजबूत करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. रावसाहेब दानवे म्हणाले की, एकेकाळी जिल्ह्यात भाजप चौथ्या क्रमांकावर असताना आम्ही काम केले. आता आमचा पक्ष एक नंबरला आला आहे. "ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आम्ही एकत्र आलोय, आता तुम्ही एकत्र या," असे आवाहन दानवे यांनी करत नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपला एकसंधपणे काम करण्याचे निर्देश दिले.












Click it and Unblock the Notifications