SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं?
इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामाचे बिगुल वाजायला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. सर्वच संघ सध्या मैदानावर घाम गाळत असून सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) ताफ्यातही जोरदार सराव सुरू आहे. मात्र, शनिवारी झालेल्या एका अंतर्गत सराव सामन्यादरम्यान मैदानावरील वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. संघाचा प्रभारी कर्णधार ईशान किशन आणि फिरकीपटू झीशान अन्सारी यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

मैदानावरील तो थरार आणि वादाचे पडसाद
या सामन्यात ईशान किशन कमालीच्या फॉर्मात फलंदाजी करत होता. त्याने झीशान अन्सारीच्या एकाच षटकात आक्रमक पवित्रा घेत तब्बल २० धावा कुटल्या. या धुलाईमुळे अन्सारी काहीसा दबावात होता, पण त्याने हार मानली नाही. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अन्सारीने ईशानला चकवून त्याची विकेट काढली. विकेट मिळाल्यानंतर अन्सारीचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्याने अतिउत्साहात ईशानला उद्देशून काही कडक शब्द वापरले. यावर ईशानही संतापला आणि दोघांमध्ये काही काळ बाचाबाची झाली. मात्र, काही क्षणातच परिस्थिती निवळली आणि ईशान हसतमुखाने मैदानाबाहेर गेला, ज्यामुळे हा वाद केवळ खेळापुरता मर्यादित असल्याचे स्पष्ट झाले.
पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत ईशानवर मोठी जबाबदारी
यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. त्याच्या गैरहजेरीत अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. २०२५ चा हंगाम हैदराबादसाठी विसरण्याजोगा ठरला होता. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांसारख्या स्फोटक सलामीवीरांना गेल्या वर्षी चमक दाखवता आली नव्हती. केवळ हेनरिक क्लासेनने आपल्या फटकेबाजीने संघाची लाज राखली होती.
🚨 BIG FIGHT IN SRH PRACTICE MATCH !🤯
— lndian Sports Netwrk (@IS_Netwrk29) March 21, 2026
SRH captain Ishan Kishan scored 20 runs in one over against leg-spinner Zeeshan, but on the last ball of the over, Zeeshan dismissed him. After taking the wicket, Zeeshan pointed his finger at Ishan Kishan, which led to an argument between… pic.twitter.com/W9eLDOVyVB
नव्या जोमाने आरसीबीविरुद्ध मैदानात उतरणार
गतवर्षीच्या चुका सुधारून ऑरेंज आर्मी आता नव्या रणनीतीसह मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. लियाम लिव्हिंगस्टोन, हर्षल पटेल आणि शिवम मावी यांसारख्या खेळाडूंच्या समावेशामुळे संघाची बाजू भक्कम दिसत आहे. सनरायझर्स हैदराबाद आपल्या मोहिमेची सुरुवात २८ मार्च रोजी बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध (RCB) करणार आहे. सरावातील हा जोश आणि खेळाडूंमधील ही स्पर्धात्मकता प्रत्यक्ष सामन्यात कशी उमटते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications