Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मनसेसमोर अस्तित्वाचे आव्हान; विधानसभा निवडणुकीतील परफाँर्मंस नडणार?

महाराष्ट्राचे सर्वाधिक लोकप्रिय नेते महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर आता अस्तित्वाचे आव्हान उभे ठाकले आहे. एकही आमदार नसल्यामुळे आणि विधानसभा निवडणुकीत पुरेशी कामगिरी न झाल्यामुळे त्यांच्या पक्षाची मान्यताच रद्द होणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. गेली 18 वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात धावणारे इंजिन अस्तित्वात राहणार की नाही, असा प्रश्न राज यांच्या पाठीराख्यांसमोर उभा ठाकला आहे.

Raj Thackeray

मनसेला लागली उतरती कळा

राज ठाकरे हे महाराष्ट्रातील एक फायर ब्रँड नेते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत वाढलेला हा तरुण नेता महाराष्ट्राला भावला. पण उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या प्रभावामुळे राज यांना शिवसेना सोडावी लागली आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. पक्ष स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सात नगरसेवक निवडून आणण्यात राज यांना यश आले. मराठीचा मुद्दा घेऊन आक्रमकपणे पुढे सरसावलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2009 च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 13 जागा जिंकल्या. 2012 च्या महानगरपालिका निवडणुकीत 27 जागा जिंकून आपले आव्हान कायम ठेवले. पण 2014 पासून राज यांच्या पक्षाला आणि संघटनेला उतरती कळा लागली. 2014 साली एक आमदार, 2019 साली एक आमदार निवडून आणणाऱ्या मनसेला 2024 साली एकही आमदार निवडून आणता आलेला नाही.

ठाकरेंची भूमिका ठरतेय अडचणीची

सतत बदलणारी भूमिका ही राज ठाकरे यांची सर्वात मोठी अडचण आहे. २०१४ साली आधी मोदींना पाठिंबा, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विरोध, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदी यांना पाठिंबा, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी युती आणि काही ठिकाणी विरोध अशी चमत्कारिक भूमिका राज ठाकरे घेत गेले आणि अडचणीत येत गेले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राज यांनी भाजपला पाठिंबा दिला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शंभरहून अधिक उमेदवार स्वतंत्रपणे उभे केले. त्यासाठी त्यांनी राज्यभर वातावरण निर्मिती देखील केली होती. मनसेचे किमान सात ते आठ आमदार निवडून येतील, अशी शक्यता होती. पण सगळे मुसळ केरात गेले.

मनसेचे दिग्गज झाले पराभूत

हक्काने निवडून येणारा मनसेचा आमदार म्हणून बाळा नांदगावकर यांच्याकडे पाहिले जात होते. शिवडी मतदारसंघात महायुतीने नांदगावकर यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. पण नांदगावकर यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आव्हान पेलवले नाही. मनसेचा बालेकिल्ला असणाऱ्या माहिम विधानसभा मतदारसंघात राज यांनी स्वतःचे पुत्र अमित ठाकरे यांना रिंगणात उतरवले होते. ते चक्क तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. वरळी विधानसभा मतदारसंघात लढणाऱ्या संदीप देशपांडे यांना अवघी 12,000 मते मिळाली. तिथे शिवसेनेचे मिलिंद देवरा दुसऱ्या क्रमांकावर राहिले आणि आदित्य ठाकरे निवडून आले. उग्र आंदोलने करणारे ठाण्याचे अविनाश जाधव देखील पराभूत झाले. 2019 साली कल्याण ग्रामीण मधून निवडून आलेले राजू रतन पाटील यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. बेलापूर मतदारसंघात गजानन काळे यांनाही समाधानकारक मते मिळवता आली नाहीत.

राज ठाकरेंसमोर आव्हाने वाढली

शंभरहून अधिक जागा लढणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेला दहा लाख मते मिळाली. येणाऱ्या सभागृहात मनसेचा एकही आमदार असणार नाही. पंधरा वर्षानंतर ही परिस्थिती उद्भवली आहे. आता गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची हालचाल सुरू होईल. मुंबई ठाणे पुणे आणि नाशिक या चार शहरात मनसेचा मतदार अजूनही कायम आहे. पण त्या मतदाराला सामोरे जाण्यासाठी ताकतीचे कार्यकर्ते शोधणे आणि त्यांना उभे करणे हे खडतर आव्हान राज ठाकरे कसे पेलतात याची उत्सुकता आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+