युतीबाबत राज ठाकरे सावध; पक्ष पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना, संभ्रमात वाढ
त्रिभाषा सूत्राविरोधातील संघर्षातून राजकीय पातळीवर नवे समीकरण घडताना दिसत असतानाच, मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे तब्बल वीस वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आले. वरळीतील एनएससीआय डोममध्ये 5 जुलै रोजी झालेल्या संयुक्त मराठी मेळाव्याच्या निमित्ताने दोघांनी एकत्र येत एकजुटीचा संदेश दिला. "एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत" असे स्पष्टपणे उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र, राज ठाकरे यांनी मात्र युतीबाबत कोणताही ठोस संकेत दिला नाही.

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना युतीविषयी कोणतीही विधाने करण्यास मनाई केली आहे. "युतीवर बोलण्यापूर्वी माझी परवानगी घ्या" अशी स्पष्ट सूचना त्यांनी दिली आहे. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गट यांच्यात प्रत्यक्ष राजकीय युती होणार की नाही, याबाबत नव्या शंका उपस्थित झाल्या आहेत.
मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर वाढलेली युतीची चर्चा
मराठी अस्मितेच्या मुद्यावर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, यामुळे दोन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चांना अधिक बळ मिळाले. एनएससीआय डोममध्ये झालेला मेळावा उत्साहात पार पडला आणि भाषणांमधून मराठीच्या हक्कासाठी एकत्र लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून राज ठाकरे यांना सोबत घेण्याची इच्छा तीन-चार वेळा सूचित केली. मात्र, राज ठाकरे यांनी त्याला तितकासा प्रतिसाद दिला नाही.
'माझ्या परवानगीशिवाय कोणीही युतीवर बोलणार नाही' - राज ठाकरे
संयुक्त मंचानंतर लगेचच युतीबाबत बोलण्यास सुरुवात झाली होती. काही पदाधिकाऱ्यांनीही सकारात्मक संकेत दिले. मात्र, राज ठाकरे यांनी त्यावर ब्रेक लावत सर्वांना समजावून सांगितले की, "माझी परवानगी न घेता कोणीही युती संदर्भात भाष्य करू नये." त्यामुळे त्यांच्या मनात याबाबत अद्याप स्पष्टता नाही हे अधोरेखित झाले.
राज ठाकरे यांची भूमिका ठरणार निर्णायक
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मराठी समाजाला एकत्र येण्याचे आवाहन करताना बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा मुद्दा उपस्थित केला. पण ही एकजूट निवडणूकपूर्व युतीच्या रूपात असेल की फक्त सामायिक मुद्द्यांवर एकत्र आंदोलन करणे, याबाबत काहीच ठोस बोलले नाही.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून युतीसाठीचा हात पुढे आला असला तरी अंतिम निर्णयाचा गुडगूड राज ठाकरे यांच्या भूमिकेवर अवलंबून राहिला आहे. यामुळे पुढील काळात मनसे-शिवसेना (ठाकरे गट) युती होणार की फक्त मराठी अस्मितेवर एकमेकांच्या पाठीशी राहणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications