ठाकरेंची ठाण्यात तोफ धडाडली! गाफील राहू नका, हे युद्ध आहे असं राज ठाकरे का म्हणाले वाचा 5 मुद्द्यात
Raj thackeray thane sabha highlights :"आम्हाला सत्तेचा कोणताही हव्यास नाही, पण डोळ्यादेखत आपली शहरे परक्यांच्या हातात जाता कामा नयेत, यासाठीच हे युद्ध सुरू आहे," अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील 'शिवशक्ती' सभेतून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरला. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाण्याच्या घोडबंदर परिसरात पार पडलेल्या या जाहीर सभेत राज ठाकरेंनी स्थानिक प्रश्नांपासून ते राष्ट्रीय धोरणांपर्यंत विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
एकाच उद्योगपतीच्या हातात देशाची सूत्रे जाणे लोकशाहीसाठी कसे घातक आहे, हे सांगतानाच त्यांनी मुंबई-ठाण्याच्या जमिनी आणि संस्कृती वाचवण्यासाठी "मशाल आणि इंजिन" एकत्र येणे काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले. मतदानाच्या दिवशी जागरूक राहण्याचे आवाहन करत त्यांनी ठाणेकरांना आपल्या अस्तित्वासाठी ठामपणे उभे राहण्याचे साकडे घातले.

१. सत्तेचा हव्यास नाही, तर शहरे वाचवण्याचे हे युद्ध
ठाण्याच्या सभेत राज ठाकरेंनी स्पष्ट केले की, ही लढाई केवळ सत्तेसाठी नाही, तर आपली शहरे वाचवण्यासाठी आहे. "आमच्या डोळ्यादेखत आपली शहरे इतरांच्या ताब्यात जाऊ नयेत, यासाठीच हे स्वाभिमानाचे युद्ध सुरू आहे," असे भावनिक आवाहन त्यांनी ठाणेकरांना केले.
२. आमिषांना बळी न पडता स्वाभिमानाने लढा
निवडणुकीत दिल्या जाणाऱ्या पैशांच्या प्रलोभनांवर राज ठाकरेंनी कडाडून टीका केली. डोंबिवलीतील धात्रक कुटुंबाचे उदाहरण देत, कोटींच्या ऑफर्स नाकारून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचे त्यांनी कौतुक केले. ५ हजार रुपयांसाठी आपले मत आणि स्वाभिमान विकू नका, असा संदेश त्यांनी मतदारांना दिला.
३. एकाधिकारशाही विरुद्ध उद्योगजगताचा समतोल
राज ठाकरेंनी उद्योगांच्या वाढीचे समर्थन केले, मात्र एकाच उद्योगपतीवर होणाऱ्या अतिमेहरबानीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "देशात सर्व उद्योगपती मोठे व्हावेत, केवळ एकाचीच मक्तेदारी नको. जर एक कंपनी संपूर्ण वाहतूक ठप्प करू शकत असेल, तर ते देशाच्या सुरक्षेसाठी विचार करण्यासारखे आहे," असे मत त्यांनी मांडले.
आज, १२ जानेवारी २०२६ रोजी ठाणे येथे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवशक्तीची जाहीर सभा पार पडली. या सभेत माझे व शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले.
— Raj Thackeray (@RajThackeray) January 12, 2026
माझ्या भाषणातील प्रमुख मुद्दे -
- भाजपचे लोकं पैसे वाटतायेत आणि शिंदेंचे लोकं पकडतायेत. काय चालुये… pic.twitter.com/FpYxSOOWG2
४. अस्मितेचा हुंकार
मुंबई विमानतळावरील सांस्कृतिक बदलांवर भाष्य करताना ते म्हणाले की, "प्रत्येक राज्याची एक भाषा आणि स्वाभिमान असतो. मुंबई विमानतळावर जर काही वाजायचे असेल, तर ते फक्त ढोल आणि लेझिमच वाजले पाहिजे." स्थानिक संस्कृतीशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
५. १५ तारखेला सतर्क राहा; दुबार मतदानाला चोख प्रत्युत्तर द्या
आगामी मतदानाच्या दिवशी सर्व कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले. "कुठेही गाफील राहू नका. जर कोणी चुकीच्या पद्धतीने किंवा दुबार मतदान करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला तिथेच रोखा," असे कडक निर्देश त्यांनी दिले.












Click it and Unblock the Notifications