न्यायाधीश-गुन्हा कबूल आहे का?; राज ठाकरे म्हणाले, मला गुन्हा मान्य नाही, ठाणे कोर्टात काय घडलं?
Raj Thackeray court appearance : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याशी संबंधित एका जुन्या प्रकरणी आज ठाणे न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. २००८ साली कल्याण रेल्वे स्थानकावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
या सुनावणीसाठी राज ठाकरे स्वतः ठाणे न्यायालयात उपस्थित राहिले होते. यावेळी न्यायाधीशांनी त्यांना 'गुन्हा कबूल आहे का?' असा थेट प्रश्न विचारला, ज्यावर राज ठाकरे यांनी स्पष्टपणे 'मला गुन्हा कबूल नाही,' असे उत्तर दिले. ठाणे न्यायालयात या दरम्यान नेमके काय घडले, जाणून घ्या सविस्तर.

नेमकं प्रकरण काय?
हे प्रकरण २००८ सालातील आहे. त्यावेळेस रेल्वे भरती परीक्षा सुरू असताना कल्याण रेल्वे स्थानकावर मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण केली होती आणि रेल्वे मालमत्तेचे मोठे नुकसान केले होते. 'मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या' असा आरोप करत, राज ठाकरे यांनी परप्रांतीय लक्ष्य करून हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
या हल्ल्यांच्या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह सात इतर मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यांना अटकही झाली होती. नंतर राज ठाकरेंना दिलासा मिळाला होता. सुरुवातीला कल्याण न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती, मात्र नंतर हा गुन्हा ठाणे रेल्वे न्यायालयात वर्ग करण्यात आला.
सुनावणी दरम्यान आरोपी न्यायालयात हजर राहत नसल्याने न्यायालयाने राज ठाकरेंसह सर्व आरोपींना समज देत अटक वॉरंट देखील बजावले होते. नंतर राज ठाकरे यांच्या वकिलांनी अर्ज दाखल करून ते अटक वॉरंट रद्द करून घेतले होते. या पार्श्वभूमीवर, आजच्या सुनावणीला राज ठाकरे उपस्थित राहिले.
ठाणे न्यायालयातील सुनावणीला काय काय घडलं?
न्यायाधीशांचा थेट प्रश्न: सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी राज ठाकरे यांना थेट विचारणा केली की, "गुन्हा कबूल आहे का?"
राज ठाकरेंचे स्पष्ट उत्तर: या प्रश्नावर राज ठाकरे यांनी तत्काळ आणि स्पष्ट उत्तर दिले, "मला गुन्हा कबूल नाही."
कोर्टाकडून सहकार्याची अपेक्षा : राज ठाकरेंचे उत्तर ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी त्यांना सांगितले की, "एक महिन्यात हे प्रकरण संपून जाईल, त्यामुळे कोर्टाला सहकार्य करा."
राज ठाकरेंचे आश्वासन: यावर राज ठाकरे यांनी, "मी पूर्ण सहकार्य करणार," असे आश्वासन दिले.
सुनावणीची समाप्ती: त्यानंतर आजची सुनावणी समाप्त झाली.
राज ठाकरे यांचे वकील ओंकार राजूरकर काय म्हणाले?
सुनावणी झाल्यानंतर राज ठाकरे यांचे वकील ओंकार राजूरकर यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, "राज ठाकरे आज हजर झाले. मात्र, आता पुन्हा त्यांना हजर राहण्याची गरज नाही. आज न्यायाधीशांनी त्यांना गुन्हा कबूल आहे की नाही, असे विचारले.
परंतु, राज ठाकरे यांनाही गुन्हा कबूल नाही, असे त्यांनी सांगितले. येत्या एका महिन्यात केस पूर्ण होईल, त्यामुळे कोर्टाला सहकार्य करा, असे न्यायाधीशांनी सांगितले आहे. राज ठाकरे हे पूर्ण सहकार्य करणार आहेत."
वकिलांनी सांगितले की, पुढील तारीख अजून ठरलेली नाही, ती लवकरच दिली जाईल. या प्रकरणाच्या जलद समाप्तीसाठी कोर्टाने सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली असून राज ठाकरेंनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.












Click it and Unblock the Notifications