इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेवरून राज ठाकरे सरकारवर बरसले; प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर केले प्रहार
मावळ तालुक्यातील कुंडमळा परिसरात रविवारी मोठी दुर्घटना घडली. इंद्रायणी नदीवर असलेला जुना लोखंडी पूल अचानक कोसळल्याने अनेक पर्यटक पाण्यात वाहून गेले.

या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचे मृतदेह सापडले असून, अन्य काही जण बेपत्ता आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने (NDRF) रात्री उशिरापर्यंत बचावकार्य हाती घेतले होते. सध्या ड्रोनच्या मदतीने शोध मोहीम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर कठोर टीका केली आहे.
"नेहमीचं सरकारचं एकसारखचं वक्तव्य; पण याआधी काय केलं?"
राज ठाकरे यांनी सरकारवर टीका करताना म्हटलं की, "दुर्घटना घडल्यानंतर सरकारकडून एकच सारखचं वाक्य ऐकायला मिळतं - 'सरकार पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे.' पण हे सगळं घडल्यानंतरच का? या आधी प्रतिबंधात्मक उपाययोजना का केल्या जात नाहीत?"
ते पुढे म्हणाले, "जर पूल जुना, धोकादायक झाला होता, तर त्याचं परीक्षण, दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी का झाली नाही? सरकारच्या अनेक विभागांचा काय उपयोग, जर ते वेळेवर अशा ठिकाणी उपाययोजना करु शकत नाहीत?"
"तुमच्या सत्तेचा अनुभव जनतेला उपयोगी पडतोय का?"
राज ठाकरे यांनी प्रशासनाच्या अपयशाबरोबरच सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. "जर प्रशासन दुर्लक्ष करत असेल, तर सत्तेत बसलेल्यांनी पुढाकार घेऊन कामं करवून घेतली पाहिजेत. तुम्ही अनेक वर्षांपासून सत्तेचा अनुभव घेत आहात, पण त्याचा प्रत्यक्ष उपयोग राज्याच्या हितासाठी होतोय का?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
"नागरिकांनीही भान ठेवायला हवं"
राज ठाकरे यांनी नागरिकांनाही सावध राहण्याचं आवाहन केलं. "असे धोकादायक पूल आणि ठिकाणी कुटुंबासोबत जाताना नागरिकांनी देखील थोडं जबाबदारीने वागायला हवं. सरकार निष्काळजी असू शकतं, पण आपण स्वतः तरी सजग असणं गरजेचं आहे."
"पावसाळ्याची सुरुवात आणि प्रशासनाचा ढिसाळपणा"
पावसाळ्याला सुरुवात होताच राज्यभर अनेक ठिकाणी पूल कोसळणे, रस्त्यांवर पाणी साचणे आणि वाहतुकीची अडचण निर्माण होणं, अशा समस्या दिसून येत आहेत. यावर भाष्य करत राज ठाकरे म्हणाले, "सध्या तरी सरकारने युद्धपातळीवर काम करायला हवं. नागरिकांना कमी त्रास व्हावा यासाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना हाती घेतल्या पाहिजेत."












Click it and Unblock the Notifications