असल्या काड्या घालून..मुंबई कुणाची? जोशी बुवांना समजू नये का? संघाच्या 'या' नेत्यावर राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray on Bhaiyaji Joshi : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी सहकार्यवाहक भय्याजी जोशी यांनी मराठी भाषा आणि मुंबईबद्दल वक्तव्य केलं. या वक्तव्यावरुन विधानसभेत गदारोळ झाला आणि पडसाद उमटले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी भय्याजी जोशींवर जोरदार टीका केली. "मुंबई कुणाची येथे कोणती भाषा बोलली जाते हे ब्रिटीश माणसाला समजतं हे जोशीबुवांना समजत नसेल का?" असा सवाल त्यांनी केला.
काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं विधान केल्याच ऐकलं . देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय ?"

भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं
राज ठाकरे म्हणाले, "भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं.... आणि भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का ? उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता... भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का ?"
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं विधान केल्याच ऐकलं .
— Raj Thackeray (@RajThackeray) March 6, 2025
देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी…
मराठी जनता दुधखुळी नाही..
राज ठाकरे म्हणाले, "सध्या MMR रिजनमध्ये चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरवात होताना दिसत आहेत . हे काय चाललय हे न समजण्या इतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं ! हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी ठेवावं?"
ब्रिटीश माणसाला समजते जोशीबुवांना समजत नाही का?
राज ठाकरे म्हणाले, "आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला , त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येउन मराठीत बोलून गेले . त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते तर मग जोशी बुवांना हे समजू नये ? या असल्या काड्या घालून ( अर्थात राजकीय हेतू असल्या शिवाय हे होणे नाही ) नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे ! बाकी सविस्तर ३० तारखेला गुढीपाडव्याला बोलूच ! महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं ! "
भय्याजी जोशींचे 'ते' वक्तव्य काय?
राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत वक्तव्य केले या वक्तव्याचे विधानसभेत पडसाद उमटले आहेत. घाटरकोपर येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना मुंबई ही कुठलीही एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा असून वेगवेगळ्या परिसरामध्ये विविध भाषा बोलल्या जातात. घाटकोपरची भाषा गुजराती आहे. तर गिरगाव येथे हिंदी बोलणारे कमी आहेत. तिथे मराठी भाषा बोलणारे लोक आढळतील. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकावं असं काही नाही, असं विधान भैय्याजी जोशी यांनी केलं आहे.












Click it and Unblock the Notifications