ठाकरे बंधू खरचं एकत्र येणार का?, यापूर्वी कधी प्रयत्न झाले, सेना-मनसे युती का होत नाही, राजकारण काय?
Raj Thackeray and Uddhav Thackeray Latest news : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. आधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील युतीचे स्पष्ट संकेत दिले.
राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास इतर पक्षांची चांगलीच अडचण होऊ शकते. ठाकरे हा ब्रँड काय आहे, हे महाराष्ट्राला दिसून येईल अशा शब्दात शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्या भावना आहेत, परंतु, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे हे खरचं एकत्र येणार आहेत का, यापूर्वी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला होता, मग युती का होऊ शकली नाही, यासह अनेक प्रश्नांची चर्चा आता होऊ लागली आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत..!

शिवसेना-मनसे एकत्र आले, मग फायदा कोणाला?
एकीकडे सर्वच राजकीय पक्षांनी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी जोर धरलेला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिका राखणे अधिक आव्हानात्मक ठरू शकते, असे मानले जात आहे. पक्षाला लागलेली गळती ठाकरे गटाला थांबवण्यात यश येताना दिसत नाही. यातच ठाकरे गट मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याच्या मानसिकतेत आहे. यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंना चांगलाच जोर लावायला लागणार आहे, जर मनसे या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटासोबत आले तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा फायदा होणार आहे.
कारण, उद्धव ठाकरे यांच्या हातातून गेलेले पक्ष चिन्ह, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत पाडलेली मोठी फूट, त्याचबरोबर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मांडलेला वेगळा सवतासुभा. विधानसभेत उद्धवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासह विरोधी पक्षांचा झालेला दारुण पराभव.
या पार्श्वभूमीवर होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. अशातच राज ठाकरे यांनी घातलेली साद आणि उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद यामुळे मुंबई महापालिकेसाठी ठाकरे गट आणि मनसेची युती झाली तर त्याचा नक्कीच फायदा या दोन्ही पक्षांना होईल, विशेष करून उद्धव ठाकरेंना त्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
महायुती सर्वार्थाने ताकदवर
सध्या राज्यात सत्तेत असलेली महायुती सर्वार्थाने भक्कम आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवरील भगवा फडकत ठेवण्यासाठी उद्धवसेनेला जिवाचे रान करावेच लागणार आहे. उद्धवसेना आणि मनसे यांची युती झाली, तर राजकीय गणिते बदलू शकतात, अशी जाणकारांची मते आहेत.
२०१४, २०१७ साली शिवसेना-मनसे युती का झाली नाही?
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंच्या संकेतावर बोलताना सांगितले की, 2014 आणि 2017च्या घटनांचा मी साक्षीदार आहे. जेव्हा युती करावी अशी आमची भावना होती, तेव्हा बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले होते. उद्धव ठाकरेंनी त्यांना भेट दिली नाही. सुभाष देसाई त्यांना भेटले. युती करावी असा राज ठाकरे यांचा निरोप आहे, असा निरोप घेऊन बाळा नांदगावकर मातोश्रीत गेले होते. याला सर्वार्धाने प्रस्ताव म्हटला जातो. तसा कोणताही प्रस्ताव आता ठाकरे गटाकडून आमच्याकडे आला नाही. जोपर्यंत प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत राज ठाकरे कसा निर्णय घेऊ शकतात?, असेही संदीप देशपांडे म्हणाले.
काय म्हणाले मनसे नेते?
मनसेचे नेते अविनाश जाधव म्हणाले की, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या भावनांचा आम्ही आदर करतो. युती ही काही एक दिवसात होत नाही. त्यासाठी एक प्रक्रिया असते. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच राज ठाकरे करतील हे नक्की. जे सर्व नेते कॅमेरासमोर युतीसंदर्भात कॅमेरासमोर बोलतात त्यांनी एकदा उद्धव ठाकरेंना सांगावं. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना एक कॉल करावा. आम्ही खात्रीशीर सांगतो, तुम्ही एक पाऊल पुढे आला तर राज ठाकरे 100 पावले पुढे येतील हे नक्की.












Click it and Unblock the Notifications