मोठा निर्णय! .. यापुढे अधिवेशन काळात विधानसभेत यांनाच प्रवेश, इतरांना नो एंट्री!
Rahul Narvekar : विधानसभेत काल १७ जुलै २०२५ रोजी आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे विरोधक गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांत जोरदार धुमश्चक्री झाली. यानंतर काल रात्रीही विधानभवन परिसर आणि पोलिस ठाण्यात हायहोल्टेज ड्रामा झाला. आता त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी यावर स्पष्ट नाराजी व्यक्त केली तर मुख्यमंत्र्यांनीही वेदना व्यक्त करत चिंतनाची गरज असल्याचे म्हटले.
जितेंद्र आव्हाड समर्थकानंतर पडळकरांच्या समर्थकांवर फौजदारी कारवाई होत असल्याचे यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आणि त्यानंतर एक मोठी घोषणा केली. त्यानुसार यापुढे विधानसभेचे अधिवेशन जेव्हा, जेव्हा असेल तेव्हा फक्त विधानसभा सदस्य (आमदार), त्यांचे स्वीय सहायक (पीए) आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितल्याचं सुत्रांनी म्हटलं आहे.

नेमके काय म्हणाले विधानसभा अध्यक्ष नार्वेकर?
विधिमंडळ परिसरात काल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आलेले नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यासोबत आलेले सर्जेराव टकले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येत आहे असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज सभागृहात सांगितलं. हे दोघेही विधिमंडळात अनाधिकृतपणे आले होते. यापूर्वी अशी घटना कधीही घडली नव्हती असं अध्यक्ष म्हणाले.
नितीमुल्य समिती स्थापन करणार
अशाप्रकारच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी नितीमूल्य समिती स्थापन करण्यात येणार असून एका आठवड्यात याचा निर्णय होईल अशी घोषणा अध्यक्षांनी केली. यापुढे अधिवेशन काळात विधिमंडळात सदस्य, स्वीय सहायक आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल. इतर कुणालाही प्रवेश नसेल असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच मंत्र्यांनी विधिमंडळात बैठक घेण्यालाही अध्यक्षांनी मनाई केली. हे प्रकरण विशेष अधिकार समितीकडे सुपूर्द करण्यात आलं आहे.
पडळकरांनी व्यक्त केला खेद
अध्यक्षांच्या सूचनेनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी झालेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. तर या घटनेला आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जबाबदार नाही असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. तरीही या घटनेचं आपल्याला वाईट वाटतं असं आव्हाड म्हणाले. ही घोषणा विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी विधानपरिषदेत केली.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
विधिमंडळ परिसरात झलेली मारामारीच्या घटनेमुळे आपल्याला वेदना झाल्या असून याबाबत चिंतन करायची गरज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरल्या चर्चेला उत्तर देताना केलं. अशाप्रकारच्या घटनांमधून समाजाला काय संदेश देणार आहोत याचा विचार करायला हवा. आमदारांची भाषा योग्य नाही. बोलताना भान बाळगायला हवं, संसदीय परंपरेचं पालन आणि संवाद आवश्यक आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.
प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे भाष्य
प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध आपण केला असून याला सरकार पुरस्कृत दहशतवाद म्हणणं योग्य नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात हनी ट्रॅपची एकही घटना घडली नाही. केवळ नाशिकमध्ये एका महिलेने एका उपजिल्हाधिकाऱ्याविरोधात तक्रार केली होती, ती तिनं मागे घेतली असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात मागील वर्षीपेक्षा गुन्ह्यांचं प्रमाण कमी झाल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. जनसुरक्षा कायद्याबद्दल सर्वांनी गैरसमज डोक्यातून काढून टाकावा, हा कायदा केवळ माओवादी विचारसरणीच्या संघटना शोधून त्यांच्यावर बंदी घालण्यासाठी आहे असं ते म्हणाले.












Click it and Unblock the Notifications