'या' गोष्टीमुळं राज्यात लागू होणार राष्ट्रपती राजवट; पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्याने खळबळ
prithviraj chavan : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. दरम्यान राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचालींना वेग आल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
सध्या सरकारबाबत नकारात्मक वातावरण झाले असून त्यातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार असल्याचा खळबळ जनक दावा चव्हाण यांनी एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत केला आहे.

"महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे, बदलापुरात झालेली घटना यामुळे सरकारच्या कार्य पद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार आहे", असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
महाविकासआघाडीला 180 च्या आसपास जागा मिळणार
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे प्रकर, बदलापूरची घटना यामुळे जनतेत सरकारविषयी रोष आहे. राज्यभर संतप्त भावना आहेत. गेल्या शंभर वर्षांत देशात कधी पुतळा पडला नाही. त्यामुळे जगभरातही उलट-सुलट चर्चा सुरु आहेत.
महाविकास आघाडीला जवळपास 180 च्या आसपास जागा मिळतील असे केंद्रीय संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली सुरु आहेत. राष्ट्रपती राजवटीनंतर काही काळ गेल्यानंतर तसेच वातावरण शांत झाल्यानंतर निवडणुकांना सामोरे जायचे, अशा हालचाली सध्या सुरु आहेत असे चव्हाण यांनी सांगिले.
यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा नाही
काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरियाणा येथील विधानसभेची निवडणूक जाहीर केली. मात्र महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या नाहीत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले होते की, पाऊस, गणपती उत्सव आणि पितृपक्षामुळे महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रिया जम्मू-काश्मीर आणि हरियाणानंतर जाहीर करण्यात येणार आहेत
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार का?
महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार असून हरियाणा विधानसभेची मुदतही 3 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे या दोन राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहेत. तसेच 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे.
सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार का? अशी चर्चा सुरु असतानाचा पृथ्वीराज चव्हाण prithviraj chavan यांच्याही दाव्यामुळे ही चर्चा राजकीय वर्तुळात अधिक रंगली आहे.












Click it and Unblock the Notifications