'बामसेफ अन् संभाजी ब्रिगेड संपविण्याचा डाव!'; शाईफेक नंतर प्रवीण गायकवाड यांचा RSSवर गंभीर आरोप
Praveen Gaikwad Attacks RSS : माजी आमदार आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर १३ जुलै रोजी अक्कलकोटमध्ये शाईफेक करण्यात आली. संभाजी ब्रिगेडच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, प्रवीण गायकवाड यांनी या घटनेनंतर आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर गंभीर आरोप केले आहेत. आम्हाला संपविण्यासाठी संघाने प्लॅन आखल्याचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकी काय घडली होती घटना?
प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या प्रकरणी भाजप कार्यकर्ता दीपक काटेसह ७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रवीण गायकवाड यांनी काय केले आरोप?
पूर्वनियोजित हल्ला
प्रवीण गायकवाड यांच्या मते, त्यांच्यावर झालेला हल्ला पूर्वनियोजित होता आणि ते बेसावध होते. हल्ला करणारा दीपक काटे हा भाजप युवा मोर्चाचा सरचिटणीस असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यालाच या हल्ल्यासाठी निवडले होते, असे ते म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप
काही दिवसांपूर्वी बामसेफ आणि संभाजी ब्रिगेडला संपवण्याचा कट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत ठरला होता, असा दावा गायकवाड यांनी केला. पुरोगामी विचारांच्या नेत्यांना संपवण्याचे काम २०१४ पासून सुरू झाले असून, यासाठीच दीपक काटेसारख्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला निवडले, असे त्यांचे म्हणणे आहे.
आरोपीला वाचविण्यासाठी मंत्रालयातून फोन
आरोपी दीपक काटेला वाचवण्याचे प्रयत्न सुरू असून, यासाठी मंत्रालयातून फोन येत असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. इतके गंभीर गुन्हे असलेल्या काटेने त्यांना जिवंत मारण्याचा कट रचला असतानाही त्याला किरकोळ कलमे लावून सोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
मुख्यमंत्र्यांवर जबाबदारी
या घटनेनंतर सहकाऱ्यांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले असून, अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. याची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असून, राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या नात्याने पुरोगामी चळवळीवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत त्यांनाच निर्णय घ्यावा लागणार असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.
हल्ला करणारा दीपक काटे काय म्हणाला?
प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक केल्यानंतर हल्लेखोर दीपक काटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका देखील मांडली. संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावापुढे 'छत्रपती' किंवा 'धर्मवीर' असे नाव लावण्यात यावे, कारण संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्याने त्यांचा अवमान होतोय, असे काटे म्हणाले.
त्याचबरोबर, स्वामी समर्थ महाराजांवरील वक्तव्याचा देखील राग त्यांच्या मनात होता. संभाजी ब्रिगेडचे ज्ञानेश महाराव यांनी स्वामी समर्थ महाराजांवर बेताल वक्तव्य केले होते आणि त्यांचेच प्रदेशाध्यक्ष स्वामींच्या भूमीत येऊन सत्कार स्वीकारतात, त्यामुळे हा निषेध व्यक्त करण्यात आलाय, असाही दावा दीपक काटे यांनी केला.












Click it and Unblock the Notifications