ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागता कामा नये, प्रकाश आंबेडकरांच विधान
Mumbai: ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. या दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतली आहे.
यापूर्वी आंबेडकर यांनी हाकेंची फोनवरून चौकशी करत विचारपूस केली होती. मात्र गुरुवारी प्रकाश आंब थेट लक्ष्मण हाके यांच्या भेटीला पोहोचले. यावेळी त्यांनी हाकेंना पाणी पिण्याचा आग्रह केला आहे.

त्यांच्या विनंतीनंतर हाकेंनी पाणी घेतले. राज्य सरकार लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाबाबत गंभीर नसल्याची टीका आंबेडकर यांनी केली. भेटीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
पाणी प्यायला हरकत नाही
यावेळी आंबेडकर म्हणाले, ''पाणी प्यायला हरकत नाही. त्यांनी पाणी पिले पाहिजे. राज्य सरकार या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत नाही. भटक्या विमुक्तांना शाश्वत आरक्षण निघून जाते की काय, याची भीती आहे.
याबाबत शासनाने चर्चा केली पाहिजे. राजकीय पक्षांनी, राजकीय पक्षाचे नेत्यांना आपण भूमिका घ्यायला सांगितले पाहिजे. यामधून मार्ग काढला पाहिजे. आम्ही आमची भूमिका अगोदरच स्पष्ट केली आहे. ओबीसी आरक्षणाचे ताट हे वेगळं असलं पाहिजे'', असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
सगेसोयरे शब्दाची व्याख्या केली पाहिजे
''मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर त्यांचे वेगळे ताट दिले पाहिजे. भाजप संविधान बदलेल, या भीतीने संविधानाच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे जनतेचा कल महाविकास आघाडीकडे गेला. संविधानावर ओबीसींनी विश्वास ठेवला. हा सर्वात मोठा आरक्षण वाचवण्याचा भाग असू शकतो, असे मला वाटते.
मनोज जरांगे यांच्याशी बोलत असताना सगेसोयरे शब्द जे ते म्हणत होते, त्याबद्दल मी सल्ला दिला होता. सगेसोयरे शब्दाची व्याख्या तुम्ही करून घेतली पाहिजे'', असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
हाकेंच्या उपोषणाचा आज आठवा दिवस
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही या मागणीसाठी लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. बुधवारी उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. यापूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील हाके यांची भेट घेतली.
त्याशिवाय राज्य सरकारचे शिष्ठमंडळही हाके यांच्या भेटीला गेले होते. यावेळी हाके यांनी चर्चा करण्यासाठी स्वतःचे शिष्ठमंडळ पाठवण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांचे उपोषण सुरूच असून कॅबिनेटमध्ये सरकारने याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी हाके यांनी केली आहे.
मुस्लीम समाजाची मतं मिळाली असती तर मी जिंकलो असतो: आंबेडकर
प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी अकोला लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबतही भाष्य केले. लोकसभा निवडणुकीत माझ्याकडील मुस्लिम शंभर टक्के काँग्रेसकडे गेला आणि तो 100% काँग्रेसमध्ये गेल्यामुळे मी पडलो.
मला ओबीसींची आणि मागासवर्गीयांची मतं पावणेतीन लाख पडतात, ती मला यावेळेसही मिळाली. मुस्लिम समाजाची मतं माझ्याकडे आली असती तर मी जिंकलो असतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications